नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): तीन दिवसांपूर्वी पंचवटी कारंजा परिसरात असलेल्या एका लॉज जवळ गुजरातमधील एका ५३ वर्षीय प्रवाशासोबत वाद घालत ४२ हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या संशयित रिक्षाचालकाला पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
दीपक विजय यादव (३२, रा. खडकाली, जुने नाशिक) असे लूटमार करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा तसेच रोकड असा ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शुक्रवारी (दि.५) रात्री ११ वाजता गुजरात राज्यातील फिर्यादी हरिशभाई पुरुषोत्तम पंड्या हे येथील एका लॉज जवळ रिक्षातन उतरल्यानंतर संशयित रिक्षाचालक यादव याला भाडे देण्यासाठी पंड्या यांनी जर्किनच्या खिशात हात घालून नोटांचा बंडल बाहेर काढला.
रिक्षाचालकाने नोटा बघून ते लांबविण्याच्या उद्देशाने पंड्या यांना जोराचा धक्का दिला. यामुळे ते बाजूला पडले व यादव याने ४२ हजारांची रोकड हिसकावून तेथून रिक्षातून पोबारा केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाला याप्रकरणी तपासाचे आदेश दिले होते.
संशयित यादव याला पोलिसांनी शिताफीने त्यास ताब्यात घेतले आहे.. रिक्षा (एमएच१५ ईच ३५२७) आणि रोकड जप्त केली आहे. जबरी चोरीचा गन्हा दाखल केला आहे.