Amazon

नाशिक: तीन दिवसांत घरफोडीचा उलगडा; २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन आरोपी अटकेत

नाशिक। दि. २९ एप्रिल २०२६: गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या तीन दिवसांत छडा लावत गुन्हे शाखा अंबड युनिट–३ ने सुमारे २२.९४ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप रामदास आहिरे (वय ५१, रा. शिवाजीनगर, नाशिक) हे २३ एप्रिल रोजी रात्री कुटुंबासह परभणी येथे गेले होते. २५ एप्रिल रोजी पहाटे घरी परतल्यावर त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात

गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा अंबड युनिट–३ च्या पथकाने घटनास्थळास भेट देत परिसरातील ५५ हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच संशयितांच्या वर्णनावरून माहिती गोळा करत शिवाजीनगर परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. दरम्यान, चोरीस गेलेले सोने विक्रीसाठी दोन इसम सराफ बाजारात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर जाहिरातींना अडसर ठरतात म्हणून ५५ झाडे तोडली; सहा जणांना अटक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व त्यांच्या पथकाने २८ एप्रिल रोजी पंचवटी येथील रामसेतु पुल परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित अमोल रामलाल हाटकर (वय २९) व संजय उर्फ भुऱ्या रमेश दुबे (वय ४०, दोघेही रा. शिवाजीनगर) यांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या अंगझडतीत चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २२ लाख ९४ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल

अटक केलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या कारवाईमुळे परिसरातील घरफोडी प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार: प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, अंमलदार भगवान जाधव व सविता कदम नेम. गुन्हे शाखा अंबड यांनी केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790