नाशिक: गंगापूर रोडवर जाहिरातींना अडसर ठरतात म्हणून ५५ झाडे तोडली; सहा जणांना अटक

नाशिक, दि. १८ सप्टेंबर २०२६ : गंगापूर रोडवरील दुभाजकात सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेली सुमारे दहा वर्षे जुनी ५५ झाडे रात्रीच्या वेळी डिझेल कटरच्या साहाय्याने तोडून नेल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली. या संशयितांना गुरुवारी (दि. १७) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

जेहान सिग्नल ते बेंडकुळे नगर या मार्गावरील दुभाजकांच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेच्या माध्यमातून इंडियन क्रिसमस ट्री (टर्मिनालिया मादागास्कर) प्रजातीची ५५ झाडे लावण्यात आली होती. ही झाडे ३० ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी कापून नेली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आला.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

यानंतर महापालिकेने मंगळवारी (दि. १५) पोलिसांकडे तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासताना झाडे कापल्यानंतर ती एका टेम्पोमधून नेण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या आधारे वाहनाचा शोध घेत तपास पुढे नेण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम; आधार माहिती अद्यावत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

या प्रकरणात पोलिसांनी नम्रता ऍडव्हर्टाईजींगचे संचालक मच्छिंद्र विजय देशमुख (४४) तसेच अभिमन्यू खैरनार (३७), दिलीप बेंडकुळे (३४), दीपक दाते (२५), रोहिदास खुरखुटे (४५) आणि अर्जुन चारोस्कर (३८) यांना अटक केली. संशयितांविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, चोरी तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिस आणि महापालिकेच्या उद्यान विभागाने तपास करताना झाडे वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या एमएच १५ जेसी ५८३८ क्रमांकाच्या टेम्पोची माहिती मिळवली. हे वाहन एका महिलेच्या नावावर असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी वाहनचालक दिलीप सदू बेंडकुळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चॉपरचा धाक दाखवत गणेश मंडळाकडून हप्ता वसुलीचा प्रयत्न; पाच दुचाकींची तोडफोड

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, झाडे तोडल्यानंतर त्यांची वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित वाहनाचा वापर करण्यात आला होता. या तपासाच्या आधारे बेंडकुळे यालाही गुन्ह्यात अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, झाडे तोडण्यामागील नेमका उद्देश तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास केला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790