नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात फ्लेमिंगो पाहुण्यांचे आगमन; गुलाबी लाटेने जलाशयाला चढली विलक्षण झळाळी !

नाशिक। दि. ३० एप्रिल २०२६: निसर्गाच्या किमयेचा एक अद्भुत अविष्कार सध्या नाशिक जिल्ह्याचे भूषण असलेल्या आणि महाराष्ट्राची शान असलेल्या नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पाहायला मिळत आहे. एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हात, जेव्हा सर्वत्र शुष्कता जाणवू लागते, अशा वेळी २८ एप्रिल रोजी या ‘महाराष्ट्राच्या भरतपूर’मध्ये हजारो मैलांचा प्रवास करून ‘रोहित’ (फ्लेमिंगो) पक्ष्यांच्या थव्याचे आगमन झाले आहे. त्यांच्या आगमनाने गोदावरी-कादवा नद्यांच्या या संगमावर जणू काही गुलाबी रंगाची उत्सवी लाटच उसळली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर जाहिरातींना अडसर ठरतात म्हणून ५५ झाडे तोडली; सहा जणांना अटक

निसर्गाचा अनुपम सोहळा आणि गुलाबी रंगाची पखरण दिसतेय. नेहमी हिवाळ्यात दिसणारे हे पाहुणे यंदा एप्रिलच्या उत्तरार्धात अवतरल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे भरते आले आहे. २८ एप्रिलच्या त्या दुपारी जेव्हा या पक्ष्यांच्या थव्याने जलाशयावर उतरण्यास सुरुवात केली, तेव्हा ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. निळ्याशार संथ पाण्यावर या पक्षांच्या लांबसडक मानेचे आणि गुलाबी पंखांचे प्रतिबिंब पडल्यामुळे संपूर्ण जलाशय एखाद्या जिवंत कॅनव्हाससारखा भासू लागला आहे.

कच्छच्या रणातून किंवा सुदूर परदेशातून आलेल्या या पक्ष्यांना नांदुरमध्यमेश्वरमधील उथळ पाणी आणि मुबलक ‘शेवाळ’ (Algae) भुरळ घालत आहे. विशेष म्हणजे, या उन्हाळ्यातही जलाशयाची पाणीपातळी आणि तेथील खाद्य या पक्ष्यांसाठी पोषक ठरले आहे. या पाहुण्यांचा थवा जेव्हा एका लयीत आकाशात झेप घेतो, तेव्हा त्यांच्या पंखांखालील गडद गुलाबी आणि काळा रंग आकाशात रंगांची उधळण करतो.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

“विलोभनीय दृश्याचे साक्षीदार व्हा!
पक्षी निरीक्षकांसाठी आणि छायाचित्रकारांसाठी ही एक दुर्मिळ संधी आहे.. हया वर्षी अभयारण्यात करण्यात आलेल्या उत्तम अधिवास व्यवस्थापन कामाचे हे फलित आहे.” -कृष्णा भवर, उपवनसंरक्षक, वन्यजीव नाशिक

उन्हाच्या झळा असूनही, पक्ष्यांच्या या थव्याने अभयारण्यातील शांतता आणि सौंदर्य द्विगुणित केले आहे. पानवेली उच्चाटन करून पोंड तयार केल्यामुळे ह्यावर्षी मोठ्या प्रमाणावर पक्षी दिसत आहेत – हेमंत उबाळे, सहाय्यक वन संरक्षक, नांदूर मध्यमेश्वर

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीएकडून ४८ लाखांचा फ्राइड कांदा आणि तेलाचा साठा जप्त

“पहाटेच्या वेळी धुक्याच्या वलयातून दिसणारे हे ‘रोहित’ किंवा सायंकाळच्या मावळत्या सूर्याच्या प्रकाशात न्हाऊन निघणारे त्यांचे थवे पाहणे, हा एक आध्यात्मिक आणि रिफ्रेशिंग अनुभव ठरत आहे तरी सर्व निसर्ग प्रेमिनी या गुलाबी पाहुण्याना बघायला नक्की या. “ – हिरालाल चौधरी , वनपरिक्षेत्र अधिकारी , नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790