क्राईम ब्रांच युनिट १ ची कामगिरी !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या बोधले नगर जवळील आंबेडकर वाडी येथे बुधवारी (दि. १९ मार्च २०२५) रात्री नऊ ते दहाच्या सुमारास उमेश उर्फ मन्ना जाधव व त्यांचा भाऊ प्रशांत जाधव या दोघा सख्ख्या भावांची टोळक्याकडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी ५ संशयित आरोपींना अवघ्या सहा तासाच्या आत अटक करण्यात क्राईम ब्रांचच्या युनिट १ ला यश आले आहे.
परिसरात स्वत:चे वर्चस्व कायम राहावे म्हणून बुधवारी रात्री उमेश उर्फ मन्ना जाधव व त्यांचा भाऊ प्रशांत जाधव या दोघा सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आपली पथके रवाना केली होती. यावेळी आरोपींची माहिती काढत असतांना पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी आणि हवालदार विशाल काठे यांना गुप्त माहिती मिळाली की या प्रकरणातील संशयित आरोपी सागर गरड हा त्याच्या साथीदारांसह नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर रोड येथील डाळिंब मार्केट येथे येणार आहे. त्याप्रमाणे पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली.
यात सागर मधुकर गरड (वय-३२वर्षे, रा- आंबेडकरवाडी उपनगर नाशिक), अनिल विष्णु रेडेकर (वय-४० वर्षे, रा- उत्तरानगर पोतदार शाळेजवळ, तपोवनरोड नाशिक), सचिन विष्णु रेडेकर (वय-४४वर्षे, रा-गायत्री नगर, पुणेरोड नाशिक), अविनाश उर्फ सोनु नानाजी उशिरे (वय-२६ वर्षे, रा- सर्वेश्वर चौक, नविन सिडको उत्तमनगर, नाशिक) आणि योगेश चंद्रकांत रोकडे (वय-३०वर्षे, रा- आंबेडकरवाडी, उपनगर नाशिक) या संशयितांना शिताफीने अटक केली. संशयित आरोपींना ताब्यात घेवुन उक्त गुन्हया बाबत विचारपुस करता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव पोलीस, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक: चेतन श्रीवंत, रविंद्र बागुल, सुदाम सांगळे, पोलीस हवालदार: प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, विशाल काठे, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार: मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, चालक पोअं/समाधान पवार तसेच पंचवटी पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार तुषार मोकळ, कैलास महाले तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाकडील पोअं/अमोल टर्ले अशांनी संयुक्त रित्या केलेली आहे.