नाशिक: १० चाकी हायवा चोरीप्रकरणी दोघांना २४ तासांत अटक; ४७ सीसीटीव्हींच्या मदतीने शोध

नाशिक। दि. १९ जुलै २०२६: छत्रपती संभाजीनगर मार्गावरून चोरीला गेलेल्या १० चाकी हायवा ट्रकचा अवघ्या २४ तासांत शोध घेत आडगाव पोलिसांनी दोन सराईत आरोपींना जेरबंद केले. तब्बल ४७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत छत्रपती संभाजीनगर-जालना सीमेवर ही कारवाई केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विष्णू आकात आणि दीपक लांडगे (दोघेही रा. जालना) अशी असून, त्यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे.

आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश कहांडळ यांचा (एमएच १५ एचएच ७६५१) क्रमांकाचा हायवा ट्रक लाखलगाव येथील पेट्रोल पंपावर उभा असताना अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

गुन्हा दाखल होताच पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवत छत्रपती संभाजीनगर मार्गावरील ४७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयितांचा माग काढत पथक छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले.

त्यानंतर करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलिस आणि नागरिकांच्या सहकार्याने शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी रस्त्याच्या कडेला चोरीचा हायवा उभा असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या शेजारी (एमएच २४ व्ही ४११५) क्रमांकाची स्विफ्ट कारही आढळून आली.. पोलिसांनी तत्काळ परिसराला घेराव घालून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी हायवा चोरीची कबुली दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

ही कारवाई गुन्हे शोध पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी सतीश जगदाळे, मनोज परदेशी, दादा वाघ, नीलेश काटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790