नाशिक: सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर अखेर अटकेत; साथीदारासह पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक। दि. १९ मार्च २०२६: धारदार शस्त्रे व गावठी पिस्तूल बाळगून परिसरात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर (वय २५, रा. बेथेलनगर, शरणपूर रोड) याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत त्याचा साथीदार श्रवण विशाल पगारे (वय २०, रा. कॅनडा कॉर्नर) यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

पाटणकर हा मागील वर्षभरापासून पोलिसांना चकवा देत फरार होता. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खून प्रकरणासह सरकारवाडा व पंचवटी परिसरातील गोळीबाराच्या घटनांमध्ये तो वाँटेड होता.

गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आनंदवल्ली परिसरात सापळा रचला. पुलाखाली संशयास्पद हालचाली करताना पाटणकर दिसताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

दरम्यान, पाटणकरने अलीकडेच हनुमानवाडीतील मोरे मळा भागात साथीदारांसह कोयते फिरवत वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केल्याची घटना घडली होती. यापूर्वीही शरणपूर येथील बेथेलनगर भागात दोन टोळ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत तो सहभागी होता आणि तेव्हाही पोलिसांना चकवा देऊन पसार झाला होता.

पाटणकरविरुद्ध अंबड, सरकारवाडा आणि पंचवटी पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपासासाठी दोघांनाही अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790