
नाशिक (प्रतिनिधी): स्वत:ला आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत माजी मंत्री तथा विद्यमान आमदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्याकडे तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका भामट्याला अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने सापळा रचून अटक केली आहे. आरोपीने आपली ओळख लपवत सातत्याने फोन करून फार्महाउसवर रेड टाकण्याची धमकी देत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता.
“मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे तुमच्या साहेबांच्या त्रंबकेश्वर फार्म हाउसवर माल ठेवलेला आहे तेथे आयकर विभागाची रेड पडणार आहे, त्या टिम मध्ये मी आहे. तुम्हाला मदत हवी असल्यास १ कोटी दयावे लागतील” अशी भामट्याने खंडणीची मागणी केली होती
ही घटना 23 एप्रिल ते 16 मे 2025 दरम्यान घडली. संतोष गायकवाड हे छगन भुजबळ यांचा अधिकृत मोबाईल फोन वापरत होते. त्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने वेळोवेळी विविध क्रमांकांवरून फोन करून आपला ओळख “आयकर अधिकारी” अशी सांगत त्र्यंबकेश्वर येथील फार्महाऊसवर छापा टाकण्याची माहिती देत, त्यात मदत हवी असल्यास 1 कोटी रुपये द्यावे लागतील, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी धमकी दिली होती.
संतोष गायकवाड यांनी तात्काळ पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर, त्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
आरोपीने गायकवाड यांना गुजरातमधील धरमपूर येथे बोलावून रोख रक्कम आणण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी काही खऱ्या व काही नकली नोटा असलेली रक्कम साक्षीदार नरेंद्र सोनवणे यांच्याकडे दिली. मात्र, आरोपीने ठरलेल्या ठिकाणी न पोहोचता वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून पथकाला चकवा देण्याचा प्रयत्न केला.
परंतु पथक नाशिककडे परतत असताना आरोपीने पुन्हा संपर्क साधून करंजाळी येथील ‘हॉटेल रितम व्हॅली’ येथे भेटायला सांगितले. पोलिसांनी वेषांतर करून सापळा रचला आणि काही वेळातच मोटारसायकलवर आलेल्या व्यक्तीने नरेंद्र सोनवणे यांच्याकडून रोख रक्कम घेण्याचा प्रयत्न केला. याच वेळी पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.
तपासादरम्यान आरोपीने आपले नाव राहूल दिलीप भुसारे (वय 27, रा. करंजाळी, ता. पेठ, जि. नाशिक) असे सांगितले. त्याने खंडणी मागितल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा शाइन मोटारसायकल, मोबाईल फोन, एक बॅग, 500 रुपयांच्या 60 नोटा, तसेच ‘बच्चों का बैंक’ या नावाचे नकली चलन आणि रद्दी नोटा असा एकूण 85,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी संतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील तपासासाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार: रमेश कोळी, प्रदीप म्हसदे, महेश साळूके, प्रशांत मरकड, विशाल काठे, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, नाजीमखान पठाण, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार: आप्पा पानवळ, नितीन जगताप, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी तसेच पंचवटी पोलीस स्टेशन कडील पोलीस हवालदार संतोष जाधव यांनी केली आहे.