नाशिक (प्रतिनिधी): “मी मेनरोडचा भाई, हप्ता द्या” अशी दहशतीची भाषा वापरत एका महिलेचा विनयभंग आणि रिक्षाची तोडफोड केल्याची घटना नाशिक शहरातील मुख्य रस्त्यालगत घडली आहे. या प्रकरणी संशयित शंभू जाधव याच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जाधववर यापूर्वीही खूनासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, तो सध्या फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती लेन परिसरात रस्त्याकडेला लहान मुलांचे कपडे विकणाऱ्या महिलेकडे संशयित शंभू जाधवने दररोज ₹५०० प्रमाणे हप्ता मागितला. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने महिलेच्या बहिणीचा विनयभंग करत धक्काबुक्की केली आणि अश्लील शिवीगाळ करत धमकी दिली की, “मी आधीच मर्डर केलेला आहे, तुझाही करीन.”
यावेळी पीडितेने व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि दुकानातील दोन गोण्या घेऊन निघून गेला.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत जुनी तांबट लेन येथे अभिषेक जाधव या रिक्षाचालकाकडेही त्याने पैशांची मागणी केली. रिक्षाचालकाने दुर्लक्ष केल्याने शंभूने रिक्षा फोडली आणि चालकाच्या डोळ्याजवळ हल्ला केला.
पोलिसांकडून तपास सुरू
या दोन घटनांनंतर आरोपी फरार असून, भद्रकाली पोलीस ठाण्याने संबंधित प्रकरणी दोन गुन्ह्यांची नोंद केली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.