शालार्थ घोटाळा: प्रशांत वाडीले धुळ्यातून अटकेत; आज नाशिकरोड न्यायालयात हजर करणार

नाशिक | दि. १२ जुलै : तब्बल १६० कोटी रुपयांच्या बहुचर्चित बनावट शालार्थ घोटाळ्याप्रकरणी गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या प्रशांत तुळशीराम वाडीले (रा. धुळे) याला धुळे येथून अटक केली आहे. वाडीले हा शिक्षण संस्थाचालक असून, त्याला रविवारी (दि. १२) नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

तपासानुसार, मागील तारखांच्या बनावट नियुक्त्या दाखवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि थकबाकी मंजूर करून घेण्याच्या रॅकेटमध्ये वाडीलेची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय आहे. धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही शिक्षण संस्थाचालकांना या गैरव्यवहारात त्याने मदत केल्याचीही शक्यता तपासली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी महाआयडी तयार करावा

या घोटाळ्यात विभागातील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत सुमारे १,२०० संशयितांची नावे तपासात निष्पन्न झाली आहेत. धुळे जिल्ह्यातील विविध शाळांमधील मागील तारखांच्या खोट्या नियुक्त्या दाखवून वाडीलेने बनावट शालार्थ आदेश तयार केल्याचा आरोप आहे. तत्कालीन उपसंचालकांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून संबंधितांना वेतन व थकबाकी मिळवून देण्यात त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जप्त गौण खनिजांचा जाहीर लिलाव आता १ सप्टेंबरला; तारखेत बदल

दरम्यान, पोलिसांनी वाडीलेच्या धुळे येथील निवासस्थानी झडती घेतली असता शिक्षकांची बनावट नियुक्तीपत्रे, काही इच्छुक शिक्षकांचे बायोडाटा, महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप तसेच बँक पासबुक जप्त करण्यात आले.

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, वाडीलेच्या नावावर धुळे जिल्ह्यात तब्बल ६५ शिक्षणसंस्था कागदोपत्री नोंद असल्याचे आढळले आहे. मात्र, प्रत्यक्षात धुळे आणि शिंदखेडा येथे केवळ दोनच शाळा सुरू असून, उर्वरित संस्थांच्या माध्यमातून बोगस शिक्षकसंख्या दाखवून शासनाचा निधी व वेतन लाटल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' विविध भागांतील वाहतूक मार्गात आज (दि. २६) महत्वाचे बदल

ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790