खोटा गुटखा तस्करीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी; पोलिस अंमलदार ९० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

नाशिक | दि. १२ जुलै २०२६ : गुटखा तस्करीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत चिकन व्यावसायिकाकडून ९० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पेठ पोलिस ठाण्यातील अंमलदार मनोज दगू गायकवाड (वय ३७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. शहरातील एका हॉटेलसमोरील चहाच्या दुकानाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १५ सप्टेंबर रोजी त्रैमासिक बैठक

तक्रारदार हे गुजरातमधील सुतारपाडा गावातील रहिवासी असून, ते चिकन व्यवसाय करतात. महाराष्ट्रातून कोंबड्यांची खरेदी करून ते कारमधून गुजरातमध्ये वाहतूक करतात. जून महिन्यात कोंबड्यांची वाहतूक करत असताना वांगणी परिसरात अंमलदार मनोज गायकवाड यांनी त्यांची गाडी अडवली. त्यावेळी ‘तू गुटख्याची अवैध तस्करी करतोस, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो,’ अशी धमकी देत गायकवाड यांनी कारवाई टाळण्यासाठी ६० हजार रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: २८ ऑगस्टला होणाऱ्या ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन; प्रवेश विनामूल्य

यानंतर ५ जुलै २०२६ रोजी गायकवाड यांनी तक्रारदाराशी पुन्हा संपर्क साधून पुढील काळात गाड्या अडविणार नाही आणि कोणतीही कारवाई करणार नाही, यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर ही रक्कम ९० हजार रुपयांवर निश्चित झाली.

याप्रकरणी तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने शहरातील एका हॉटेलसमोरील चहाच्या दुकानाजवळ सापळा रचला. तक्रारदाराकडून ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मनोज गायकवाड याला रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वाहन मालकांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रियेनंतरच हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलिस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुरेश शिरसाठ तसेच पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790