नाशिक शहरात १ जुलैपासून या नऊ मार्गांवर धावणार महापालिकेच्या ५० बसेस
नाशिक (प्रतिनिधी): नाशिककरांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पालिकेच्या शहर बससेवेला अखेर मुहूर्त लागला आहे. १ ते १० जुलैदरम्यान या बस सुरू करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात नऊ मार्गांवर ५० बस धावणार आहेत. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने शहरी बससेवेचे मार्ग निश्चित करण्यात आल्याची माहिती नाशिक मनपा परिवहन सिटी लिंकच्या कंपनीच्या बैठकीत पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने पालिकेच्या वतीने शहरात बससेवा सुरू करण्याच्या निर्णय घेण्यात आलेल्या आहे. बहुप्रतीक्षेत असलेली ही बस नाशिकरांच्या सेवेत आणण्यासाठी पालिकेच्या वतीने नियोजन केले जात असून या दृष्टीने गुरुवारी (दि. २४) महापालिकेत नाशिक मनपा परिवहन सिटी लिंक कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
संचाकलकांची नियुक्ती:
या बैठकीत कंपनीच्या संचालकपदी सभागृहनेते कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार यांची नियुक्ती करण्यात आली. याचबरोबर एस.टी.चे विभागीय नियंत्रक राजेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कंपनीसाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा अधिकारी यांची शासनाकडून नियुक्ती करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कंपनीचे मुख्य लेखाधिकारी म्हणून मनपाचे उपमुख्य लेखाधिकारी गुलाबराव गावित यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. या बैठकीत लेखापरीक्षकांची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली.
या नऊ मार्गांवर २४० थांबे राहणार आहेत.:
त्यात बदल करणे अथवा नवीन मार्ग निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणास देण्यात आलेले आहेत.
मार्ग १ : तपोवन ते बारदान फाटामार्गे सिव्हिल, सातपूर – अशोकनगर – श्रमिकनगर., मार्ग २ : तपोवन सिम्बाॅयाेसिस कॉलेजमार्गे पवननगर – उत्तमनगर., मार्ग ३ : तपोवन ते पाथर्डी गावमार्गे द्वारका – नागजी – इंदिरानगर – वनवैभव., मार्ग ४ : सिम्बायाेसिस कॉलेज ते बोरगडमार्गे शिवाजी चौक – लेखानगर – महामार्ग – म्हसरुळ – बोरगड, मार्ग ५ : तपोवन ते भगूरमार्गे शालिमार – द्वारका – बिटको – देवळाली कॅम्प., मार्ग ६ : नाशिकराेड ते बारदान फाटामार्गे द्वारका – कॉलेजरोड – सातपूर – व्हीआयपी – कार्बननाका., मार्ग ७ : नाशिकरोड ते अंबड गावमार्गे द्वारका – महामार्ग – लेखानगर – गरवारे., मार्ग ८ : नाशिकरोड ते निमाणीमार्गे जेल टाकी – सैलानीबाबा – नांदूर गाव – नांदूरनाका – तपोवन., मार्ग ९ : नाशिकरोड ते तपोवनमार्गे बिटको – द्वारका – शालिमार – सीबीएस – पंचवटी. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या नऊ मार्गांना मान्यता दिली आहे.