डेल्टा प्लसचे संकट: नाशिक जिल्ह्यातील निर्बंधांबाबत प्रशासनाचा महत्वाचा निर्णय…

डेल्टा प्लसचे संकट: नाशिक जिल्ह्यातील निर्बंधांबाबत प्रशासनाचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे..

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाट संपली असली तरी कोरोना नवीन डेल्टा प्लस या विषाणूच्या रूपाने आव्हान बनुन आपल्या समोर उभा ठाकला आहे. यादृष्टिने कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व नवीन डेल्टा प्लस या विषाणूचा संसर्ग पसरण्याची क्षमता जास्त असल्याने नागरिकांनी स्वत: काळजी घेवून कोरोना त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

गुरुवारी (दि. २४ जून) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे नाशिक शहर व जिल्हा कोरोना विषाणू आणि कोरोना पश्चात आजारांबाबत जिल्ह्यातील सद्यस्थितीची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त दुष्यंत भामरे, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, आदी आपल्या कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू; समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, केंद्र सरकारच्या सल्लागार समितीमार्फत देखील डेल्टा प्लस या विषाणूच्या अनुषंगाने राज्य शासनास काळजी घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असल्याचे मंत्रीमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे. त्यानुसार कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस या विषाणूंचे गांभिर्य लक्षात नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळावे, त्यासोबतच कोरोना विषाणूपासून बचावासाठी मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसुत्रीचा नियमितपणे अंगीकार करावा, जेणेकरून डेल्टा प्लस या नव्याने येणाऱ्या विषाणूचा सामना आपण सर्व एकत्रितपणे करू शकतो, असेही पालकमंत्री  भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा:  नाशिक: आईचंच काळीज ते! लेकराचा मृत्यू झाल्याचं कळलं, आईनेही प्राण सोडला

जिल्ह्यात या विषाणूंच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. यामुळे कडक संचारबंदीचे नागरिकांनी पालन करण्यासाठी पोलिस यंत्रणेमार्फत कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच डेल्टा प्लस या विषाणूचा फैलाव हा गर्दीच्या ठिकाणी अधिक होत असल्याने पर्यटनस्थळी व इतर ठिकाणी देखील विनाकारण गर्दी टाळण्याची दक्षता नागरिकांनी घेवून संपूर्ण जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री  भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू; समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

तसेच जिल्हा प्रशासनामार्फत पूर्वनियोजनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात ऑक्सिजनसाठ्याबाबत स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे. त्याचप्रमाणे रुग्णालयात बेडसची उपलब्धता, ऑपरेशन थिएटर, आवश्यक औषधसाठा यागोष्टींकडे लक्ष देवून त्यांची तातडीने पूर्तता होण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, असेही पालकमंत्री  भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोना सद्यस्थिती व कोरोना पश्चात होणाऱ्या म्युकर मायकोसिस याआजाराबाबत सविस्तर माहिती देवून कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्री यांना सादर केली. तसेच पोलिस आयुक्त, नाशिक महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्याक्षेत्राची माहिती पालकमंत्री यांना यावेळी सादर केली.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790