नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर गावाकडून दुचाकीने रविवारी (दि.१३) प्रवास करत असताना अचानकपणे सोमेश्वर थांब्याजवळ रस्त्यालगतचे मोठे झाड कोसळले. या झाडाखाली दबून दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेल्या त्यांच्या मातोश्री गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. अलका अनिल सोनवणे (५५, रा. शिवाजीनगर) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
गंगापूर गावातून मुलगा दीपक अनिल सोनवणे याच्यासोबत अलका सोनवणे या दुचाकीवर पाठीमागे बसून शिवाजीनगरच्या दिशेने प्रवास करत होत्या. रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सोमेश्वर बस थांब्याजवळ अचानकपणे रस्त्यालगतचे मोठे झाड कोसळले. यावेळी त्या झाडाखाली सापडून हे मायलेक गंभीर जखमी झाले. आई व मुलाला नागरिकांनी रक्तबंबाळ अवस्थेत शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
यावेळी अलका सोनवणे यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी तपासून मृत घोषित केले. तर दीपक यांच्या डोक्याला, छातीला, डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.