देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील जांबुटके येथे आकारास येणार

नाशिक। दि. ६ मे २०२६: देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे आकारास येणार आहे. त्यासाठी आवश्यक जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) करण्यात आले. यावेळी विविध सामंजस्य करारांचे आदान- प्रदान करण्यात आले.

कुंभ उद्योग संगम आणि नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेसमेन्ट समीट आज हॉटेल ताज गेट वे येथे पार पडले. त्यात या जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. गुंतवणूक परिषदेत करण्यात आलेल्या ३०० हून अधिक सामंजस्य कराराच्या माध्यमातून १३ हजार १९० कोटींची गुंतवणूक होणार आहे. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न, औषध प्रशासन व विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गांत बुधवारी (दि. ६) महत्वाचे बदल !

अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टरचे दस्तऐवज हस्तांतरीत केले. यामुळे आदिवासी क्षेत्रातील औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच स्थानिक आदिवासी बांधवांचे कौशल्य विकास आणि शाश्वत रोजगारासाठी उपयुक्त ठरणार आहे. या क्लस्टरच्या विकासासाठी आदिवासी विकास विभागाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सन २०२६ मध्ये जिल्ह्यात एकूण ३०१ सामंजस्य करार करण्यात आले असून त्यामध्ये १३ हजार १८९ कोटी ८८ लक्ष रुपयांची गुंतवणूक आणि ३२ हजार ४८७ रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यापैकी काही करारांचे दस्तावेजाचे हस्तांतरण प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे नाशिक हे भविष्यात उद्योजकांचे आवडीचे ठिकाण होईल आणि येथील औद्योगिक विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विजय व्यक्त केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा

सन २०२६ मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होत असल्याचे दिसून येते. नाशिक हे गुंतवणुकीसाठी नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून उदयास येत आहे. या गुंतवणुकीसाठी जिल्ह्यातील विविध औद्योगिक संस्था जसे की निमा, आयमा, नाईस, स्टार्स, एमसीसीआय, लघु उद्योग भारती तसेच सहकारी औद्योगिक वसाहतींच्या पदाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. गुंतवणूकदार आणि उद्योजकांसाठी ‘मैत्री’ या एकल पोर्टलद्वारे आवश्यक सर्व परवानग्या व अडचणींचे निराकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी सुलभ वातावरण निर्माण होत आहे. यांचेच प्रतिबिंब आजच्या परिषदेत दिसून आले.

यावेळी व्हीईएल (VEL) नागपूर यांच्यामार्फत त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड येथे शाश्वत जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी अंदाजित २८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार करण्यात आला. हा प्रकल्प सामाजिक दायीत्व (CSR) अंतर्गत राबविण्यात येणार आहे. यामध्ये रचना, निधी, उभारणी व २५ वर्षे संचलनाची जबाबदारी समाविष्ट आहे. या उपक्रमामुळे पाण्याची गुणवत्ता, आरोग्य, पर्यावरणीय शाश्वतता यामध्ये दीर्घकालिन सुधारणा होणार आहे. यासह वेस्टइन वाइनयार्ड रिसोर्ट ॲण्ड स्पातर्फे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून ६०० जणांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळणार आहे. याशिवाय ब्रह्मांदन पाइप्स लि. तर्फे १०० कोटी रुपये, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नाशिककडून ७५० कोटी रुपये, सह्याद्री फार्म्स- पोस्ट हॉर्वेस्ट केअरकडून ४५७.२ कोटी रुपये, एनएसजे ग्लोबल लॉजिस्टिककडून १०० कोटी रुपये, ठाकरे इस्टेट प्रा. लि. कडून १५० कोटी रुपये, स्पेक्ट्रम इलेक्ट्रीक्स इंडस्ट्रीजकडून ११० कोटी रुपये, दिलीप टेक्सटाइल्स यांच्याकडून २०० कोटी रुपये, ट्रायडंट ॲग्रो एक्स्पोर्टस यांच्याकडून ११९.८५ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. संबंधितांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाबरोबर सामंजस्य कराराचे आदान- प्रदान केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790