नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मराठा आरक्षण आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन व शिंदे, पळसे परिसरात नाशिक- पुणे महामार्गावर ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरल्याने सिन्नर-नाशिक महामार्गावरची बस सेवा राज्य परिवहन महामंडळाने बंद केली आहे.
परिवहन महामंडळाच्या शिर्डी आणि पुण्याकडून येणाऱ्या सर्व बसेस आगारात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या सिन्नर-नाशिक मार्गावर धावणाऱ्या सिटीलिंक बस देखील तहसील कार्यालय परिसरात उभ्या ठेवण्यात आल्या आहेत.
शिंदे पळसे परिसरात ठीक ठिकाणी मराठा समाज बांधव आरक्षण मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत अनुचित प्रकार आणि शासकीय मालमत्तांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सिन्नर ते नाशिक दरम्यान असणाऱ्या सर्व बस सेवा तातडीने स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या शिर्डी व पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व बसेस नाशिक मधील विविध बसस्थानकात थांबून आहेत.
तर पुणे आणि शिर्डी बाजू कडून नाशिक, सटाणा, साक्री, गुजरातकडे जाणाऱ्या सर्व बसेस सिन्नर बस स्थानकात थांबवण्याचे निर्देश राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. नाशिक पुणे महामार्गावर गुरेवाडी फाटा येथे सिन्नर पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले असून पुण्याहून येणाऱ्या सर्व बस गुरेवाडी फाट्यावरून सिन्नर बस स्थानकात पाठवण्यात येत आहेत.
सिन्नर बस स्थानकात दोन शिवशाही, तीन शिवाई बस तसेच इतर दहा ते बारा बस दुपारी बारा वाजेपर्यंत दाखल झाल्या होत्या. सिन्नर येथून नाशिक मार्गावर धावणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पुढील सूचना येईपर्यंत शिर्डी आणि कोपरगाव येथून नाशिकच्या दिशेने बस सोडण्यात येऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत.