नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील नामांकित बिल्डर कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्याविरोधात १ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने सोमवारी (दि. ३० ऑक्टोबर) रात्री ११.३० वाजता त्यांना अटक केली आहे. या अटकेमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मुंबई नाका पोलिसात राहुल लुणावत (रा. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुणावत यांच्या फिर्यादीनुसार आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश कारडा यांची कारडा कन्स्ट्रक्शन या नावाने बांधकाम फर्म आहे.
कारडा कन्स्ट्रकशनच्या माध्यमातून अशोका मार्ग या परिसरात नरेश कारडा यांनी २०१९ मध्ये बांधकाम प्रकल्प सुरू केला होता. या बांधकाम प्रकल्पातील दोन गाळ्यांसाठी लुणावत यांना दोन गाळे कारडा देणार होते. त्यासाठी कारडा यांनी फिर्यादीकडून १ कोटी २० लाख रुपये घेतले होते.
बुकिंग रक्कम घेऊनही बांधकाम प्रकल्पाला सुरुवात होत नसल्याने तक्रारदारांनी कारडा यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र कारडांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंबई नाका पोलिसात तक्रार दिली.
त्यानुसार, सोमवारी (ता.३०) रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करून बांधकाम व्यावसायिक व कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०४३५/२०२३)