नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Breaking: नाशिकच्या गिर्यारोहकाचा माळशेज घाटातील चोरदरीत मृत्यू; चार जणांची सुखरुप सुटका
नाशिक (प्रतिनिधी): कल्याण-नगर रस्त्यावरील माळशेज घाट परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेल्या नाशिकच्या गिर्यारोहकाचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. किरण काळे (५०, रा. टाकळी रोड, नाशिक) असे मृत गिर्यारोहकाचे नाव आहे.
काळे हे भारतीय आयुर्विमा महामंडळात (एलआयसी) विकास अधिकारी (डेव्हलपमेंट ऑफिसर) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी बाराच्या सुमारास नाणेघाट परिसरातील चोरदरी येथे हा अपघात झाला. रात्री उशिरा काळे यांचे पार्थिव नाशिकला आणण्यात आले. काळे यांच्यासोबत आलेले इतर गिर्यारोहक सुखरूप असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. किरण काळे यांनी अनेक अवघड चढाई पूर्ण केल्या होत्या.
- Breaking: नाशिकला सातपूर परिसरात तरुणावर गोळीबार करत जिवघेणा हल्ला
- नाशिक जिल्ह्याच्या सुपुत्रास वीरमरण; अवघ्या 29व्या वर्षी जवान अजित शेळके शहीद
नक्की काय घडलं:
माळशेज परिसरात नाणेघाट भागात चोरदरीत नाशिकहून बारा गिर्यारोहकांचा एक गट ट्रेकिंगसाठी गेला होता. नेहमीप्रमाणे या सर्वांनी चढाईसाठी सुरुवात केली. दुपारच्या सुमारास घाटमाथ्यावर असताना चोरदरी घाट चढत असताना अनेक गिर्यारोहक अडकून पडले. याचवेळी किरण काळे हे देखील यांच्यात होते. काळे यांचा यावेळी तोल गेल्याने ते दरीत कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर स्थानिक पोलिसांनी धाव घेत इतर अडकून पडलेल्या गिर्यारोहकांची यशस्वी सुटका केली. याबाबत मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी यांनी माहिती दिली. दरम्यान, तोल गेल्याने दरीत पडून काळे यांचा मृत्यू झाला. या संदर्भात माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महसूल, वन आणि स्वयंसेवी संस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेक तासांच्या शोधानंतर काळे यांचा मृतदेह सापडला आहे.
काळे यांच्या निधनामुळे नाशिकच्या गिर्यारोहण क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.. त्यांना गिर्यारोहणाचा उत्तम अनुभव होता. त्यांनी जवळपास १०० ठिकाणी गिर्यारोहण पूर्ण केले होते. ते केके नावाने परिचीत होते. गिर्यारोहण करतानाच त्यांचे निधन झाल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसत नाहीये. अतिशय मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होता. एलआयसीशी अनेक एजंट जोडणे, अनेकानेक व्यक्तींना विम्याचे संरक्षण देणे यासाठी ते आग्रही होते. त्यात त्यांना मोठे यश मिळाले होते. एलआयसी, गिर्यारोहण यासह विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.