नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा फसवणुकीप्रकरणी पोलीस कोठडीत असतानाच त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. कारडा यांच्याविरोधात जेलरोड परिसरातील एका प्लॉटच्या व्यवहारापोटी ४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा उपनगर पोलिसात दाखल झाला आहे.
सदरचा गुन्हा तपासासाठी शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग केला आहे. सुनील देवकर (रा. बळीराम पेठ, जळगाव) यांनी उपनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचे आजोबा गजानन देवकर (९०) यांचा आणि नरेश कारडा यांच्यात २००७ पासून व्यावसायिक संबंथ आहेत. त्यातून त्यांनी २०१७ मध्यये कारडा यांच्या मालकीचा जेलरोडच्या पंचक शिवारातील प्लॉटचा दोघांमध्ये व्यवहार झाला होता.
त्या व्यवहारापोटी देवकर यांच्या आजोबांनी चार कोटी रुपये दिले होते. तर कारडा यांनी त्या मिळकतीचे खरेदीखत करण्यासाठी वेळ मागून घेतली होती. दरम्यान, कारडा यांनी २०१९ मध्ये सदरील प्लॉटची परस्पर विक्री करीत देवकर यांच्या आजोबांची फसवणूक केली. त्यानंतरही कारडा यांनी देवकर यांना दुसरी मिळकत न देता त्यांच्या चार कोटी रुपयांची फसवणूक केली. वेळोवेळी पैशांची मागणी करूनही कारडा यांनी वेळ मारून नेली.
अखेर सुनील देवकर यांनी उपनगर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार, नरेश कारडा यांच्याविरोधात फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४१०/२०२३)
सदरील गुन्हा शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे तपास करीत आहेत.
तक्रारींसाठी आवाहन:
कारडा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयातील शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, बहुतांशी ग्राहकांनी फ्लॅट वा गाळ्यासाठी कारडा कन्स्ट्रक्शनकडे खरेदीसाठी गुंतवणूक केली असून, त्यातील बहुतांशी रक्कम ही रोख स्वरुपात घेतली आहे.