🌞 आजचे तापमान- किमान: 18.8°C । कमाल: 33.3°C

नाशिक: सिटीलिंकच्या ताफ्यात आणखी नऊ वातानुकूलित ई-बसेस; सोमवारपासून तीन मार्गांवर सेवा सुरू

नाशिक। दि. २९ नोव्हेंबर २०२६ शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने सिटीलिंकने ई-बसेस सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्ताराच्या तिसऱ्या टप्प्यात आणखी नऊ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस सोमवार (दि. ३० नोव्हेंबर) पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या बसेस शहरातील तीन वेगवेगळ्या मार्गांवर धावणार आहेत.

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (सिटीलिंक) मार्फत शहरात टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात दोन ई-बसेस प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी अकरा बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या. या बसेसना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता तिसऱ्या टप्प्यात नऊ नवीन बसेस सुरू करण्यात येत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  थकीत ई-चलनांच्या दंडात २० टक्के सवलत; १ डिसेंबरपासून अभय योजना लागू

नव्या बसेसमुळे शहरातील विविध भागांमधील सार्वजनिक वाहतूक संपर्क अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. वातानुकूलित सुविधेमुळे प्रवाशांना आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

दरम्यान, इलेक्ट्रिक बसेसच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळणार आहे. पारंपरिक इंधनावरील वाहनांचा वापर कमी करणे, प्रदूषण नियंत्रणास हातभार लावणे आणि सार्वजनिक वाहतुकीकडे अधिकाधिक नागरिकांना आकर्षित करणे, या उद्देशाने सिटीलिंककडून ई-बसेस सेवेचा विस्तार केला जात आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि शाश्वत करण्याच्या दिशेने सिटीलिंकचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ महाकुंभमेळा: संभाव्य धोके, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आपत्कालीन प्रतिसादावर चर्चा

या मार्गावर सेवा:
मार्ग क्रमांक ३४२-
आडगाव डेपो ते गंगापूर गाव, आडगाव डेपो येथून जत्रा हॉटेल, शालिमार, के.टी.एच.एम. कॉलेज व आनंदवलीमार्गे गंगापूर गाव आणि पुन्हा त्याच मार्गाने आडगाव डेपो.
मार्ग क्रमांक ३६३- सी.बी. एस. ते भुजबळ नॉलेज सिटी, सी.बी.एस. येथून हिरावाडी, अमृतधाममार्गे भुजबळ नॉलेज सिटी आणि पुन्हा त्याच मार्गाने सी.बी.एस.
मार्ग क्रमांक ३७४- आडगाव डेपो ते पाथर्डी गाव, आडगाव डेपो येथून द्वारका, महामार्ग व कलानगरमार्गे पाथर्डी गाव आणि पुन्हा त्याच मार्गाने आडगाव डेपो.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी २८ व २९ नोव्हेंबरला विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन

तिसऱ्या टप्प्यात सुरू होणाऱ्या तीन मार्गांची माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790