नाशिक। दि. १७ नोव्हेंबर २०२६: शहरातील सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर आणि फ्लेक्सविरोधात नाशिक महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे सोमवार (दि. १६ नोव्हेंबर) पासून शहरातील सहाही विभागांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तब्बल १२३ अनधिकृत जाहिरात फलक हटवून जप्त करण्यात आले.
महापालिकेच्या या कारवाईत नाशिकरोड विभागातून १८, नाशिक पूर्वमधून २८, नाशिक पश्चिममधून १८, नवीन नाशिकमधून १६, सातपूरमधून २०, तर पंचवटी विभागातून २३ अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर आणि फ्लेक्स जप्त करण्यात आले.
शहरात विविध ठिकाणी विनापरवानगी जाहिरात फलक लावण्याचे प्रकार वाढत असल्याने महापालिकेने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. सार्वजनिक जागांवरील अनधिकृत जाहिरात फलकांवर यापुढेही सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या या मोहिमेमुळे शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांना आळा बसण्यास मदत होणार असून, शहराचे विद्रुपीकरण रोखण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
![]()


