नाशिक, दि. १६ नोव्हेंबर २०२६ : एमएनजीएल अपडेट करण्याच्या बहाण्याने व्हॉट्सॲपवर पाठविण्यात आलेली बनावट APK फाइल उघडणे एका नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. या फाइलच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी संबंधित व्यक्तीच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डमधून १ लाख ४८ हजार ८६९ रुपये परस्पर वळते करत आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी ५१ वर्षीय नागरिकाने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या व्हॉट्सॲपवर एका अनोळखी व्यक्तीने एमएनजीएल अपडेट करण्यासंदर्भातील APK फाइल पाठवली होती. एमएनजीएलचे अपडेट असल्याचे समजून त्यांनी ही फाइल उघडली. मात्र, त्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्या आयसीआयसीआय क्रेडिट कार्डमधून यूपीआय व्यवहाराद्वारे १ लाख ४८ हजार ८६९ रुपये काढण्यात आले.
आपल्या खात्यातून परस्पर रक्कम वळती झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.
नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲपद्वारे प्राप्त होणाऱ्या APK फाइल्स डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नयेत. कोणत्याही सेवा किंवा गॅस कंपनीचे अपडेट असल्याचा दावा करणाऱ्या संशयास्पद लिंकपासून सावध राहावे.
![]()


