Amazon

नाशिकमध्ये थंडीची चाहूल; किमान तापमान १४.३ वर, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता, घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

नाशिक। दि. २८ ऑक्टोबर २०२६: ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस नाशिककरांना थंडीची चाहूल लागली असून, दुसरीकडे जिल्ह्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. शहरातील किमान तापमान घसरून आज (दि. २८) १४.३ अंश सेल्सिअसवर आले आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्यासह घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. काही भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याचीही शक्यता आहे.

तीन दिवसांत तापमानात घसरण:
यंदा ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागल्या. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा थंडी कमी जाणवेल, अशी चर्चा सुरू असतानाच आता तापमानात घट होऊ लागली आहे. शहरात यंदाच्या ऑक्टोबरमध्ये कमाल तापमान ३५.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांत किमान तापमान २० अंशांवरून घसरून १४.३ अंशांपर्यंत आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर रोडवरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यासाठी पर्यायी समांतर मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज (दि. २८) सकाळी साडेआठच्या सुमारास नाशिकमध्ये किमान तापमान १४.३ अंश, तर काल (दि. २७) कमाल तापमान ३३.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. निफाडमध्येही किमान तापमान १४.१ अंशांपर्यंत घसरले. त्यामुळे पहाटे आणि सकाळच्या वेळी हवेत गारवा जाणवू लागला आहे.

यंदाच्या हिवाळ्यात मागील वर्षाप्रमाणे तीव्र थंडी पडण्याची शक्यता कमी असून, हंगामात किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते. त्यामुळे आगामी काळात नाशिककरांना हलक्या थंडीचा अनुभव येण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने वार करणाऱ्या पतीला १० वर्षे सक्तमजुरी

चक्रीवादळामुळे हवामानात बदल; घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज:
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टीसह महाराष्ट्रातील हवामानावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असून, या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, उत्तर भारतातील पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्स), उंचावरील चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांमुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा परिणाम नाशिक जिल्ह्यातही होण्याची शक्यता आहे.

विशेषतः इगतपुरी तालुक्यासह घाटमाथ्यावरील भागांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. त्यामुळे एका बाजूला तापमानातील घसरणीमुळे थंडीची चाहूल लागली असताना, दुसरीकडे पावसाच्या शक्यतेमुळे हवामानात चढ-उतार जाणवण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल

आंध्र प्रदेश, ओडिशाला अतिवृष्टीचा इशारा:
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ तीव्र झाल्याने आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे. या भागांतील हवामान स्थितीचा परिणाम देशाच्या इतर भागांतील वातावरणावरही होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील दोन ते तीन दिवस हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवावे. विशेषतः घाटमाथ्यावर प्रवास करणाऱ्यांनी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790