Amazon

नाशिक: मध्यवर्ती कारागृहाचे स्वयंपाकगृह अद्ययावत करण्यासाठी एक कोटींचा निधी

नाशिक। दि. २९ सप्टेंबर २०२६: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज साळी नाशिक मध्यवर्ती कारागृहास भेट देऊन कारागृहातील विविध सुविधा व व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी बंदींच्या आरोग्य सुविधा, महिला बंदी कक्ष, तृतीयपंथीय बंदी कक्ष, स्वच्छतागृहे, कपडे धुण्याची सुविधा तसेच न्यायालयीन सुनावणीसाठी उपलब्ध असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) सुविधेची पाहणी केली.

यावेळी कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव आणि निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एससी, एसटी प्रवगातील युवक- युवतींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कारागृहातील रुग्णालयाची पाहणी करून बंदींच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. सर्व बंदींची वार्षिक वैद्यकीय तपासणी येत्या एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कारागृहातील स्वयंपाकगृहाचीही पाहणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून स्वयंपाकगृहातील आवश्यक सुधारणा करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक विभागात २९ सप्टेंबरला १२२ ठिकाणी रोजगार महाकुंभाचे आयोजन

तसेच साने गुरुजी कक्षाची पाहणी करून तेथील व्यवस्थेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. कारागृहातील महिला व तृतीयपंथीय बंदींसाठीच्या स्वतंत्र कक्षांसह स्वच्छतागृहे, कपडे धुण्याची सुविधा आणि इतर मूलभूत सोयी-सुविधा यांचीही त्यांनी पाहणी केली.

पॅरोलवर सुटलेले आणि त्यानंतर परत न आलेले तसेच कारागृहातून फरार झालेले बंदी यांची अद्ययावत यादी पोलीस विभागास नियमितपणे उपलब्ध करून देण्यात यावी तसेच सामान्य रुग्णालय, नाशिक येथे असलेला प्रीझन वॉर्ड संबंधितांनी दुरुस्त करून घ्यावा. संचित पॅरोल रजेकरीता पोलीस अहवाल त्वरित देणे, बंदींना सामान्य रुग्णालय येथे पाठविण्याकरता पोलीस गार्ड उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. कारागृह प्रशासन व पोलीस विभागामध्ये आवश्यक समन्वय राखून अशा प्रकरणांमध्ये प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रविवार असूनही आज बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप

बंदींच्या आरोग्य, सुरक्षितता आणि पुनर्वसनाच्या दृष्टीने उपलब्ध सुविधांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून कारागृह व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी भर दिला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790