Amazon

नाशिकमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार; सोमवारी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट

नाशिक। दि. २० सप्टेंबर २०२६: मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असतानाच नाशिक जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी (दि. २०) शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असून, सोमवारी (दि. २१) सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या भागात रविवारीही दमदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरातील वातावरणात पुन्हा उष्मा जाणवू लागला आहे. कमाल तापमानातही वाढ झाली असून, शनिवारी (दि. १९) सायंकाळपर्यंत कमाल तापमान ३०.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाणही वाढले असून, सकाळी ८५ टक्के, तर सायंकाळी ६० टक्के आर्द्रतेची नोंद झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: श्री साक्षी गणेश मंदिरात आज सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या मागील २४ तासांत नाशिक शहरात २.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत वातावरणात अचानक बदल जाणवू लागला आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सौराष्ट्राच्या दिशेने सरकल्याने त्याचा परिणाम नाशिकच्या पश्चिम भागात जाणवण्याची शक्यता आहे. या प्रणालीचा फायदा नाशिकच्या पश्चिम भागाला पुढील आठवडाभर मिळू शकतो, अशी माहिती हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर जाहिरातींना अडसर ठरतात म्हणून ५५ झाडे तोडली; सहा जणांना अटक

रविवारी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, हरसूल आणि सुरगाणा या घाटमाथ्याच्या परिसरात पावसासह वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या भागात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४०, तसेच काही ठिकाणी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे घाटमाथ्याच्या भागातील नागरिकांनी आणि प्रवाशांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790