नाशिक: २४ मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई; ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहिमेला वेग

नाशिक। दि. १५ सप्टेंबर २०२६ : शहर आणि परिसरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल २४ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांमध्ये पोलिसांच्या कारवाईची धास्ती निर्माण झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गणेशोत्सवासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त; नाशिकमधील ४०२ सराईत गुन्हेगार तडीपार

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या घटनांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अशा वाहनचालकांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत गवळी आणि सहायक पोलिस आयुक्त माधव रेड्डी यांनी चारही वाहतूक शाखांच्या युनिट प्रमुखांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. संशयास्पद वाहनचालकांची ‘ब्रेथ अॅनालायझर’द्वारे तपासणी करून त्यांनी मद्यसेवन केले आहे की नाही, हे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक पकडली; १२.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

शुक्रवारपासून (दि. ११) शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणी संशयास्पद दुचाकी, तीनचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहने थांबवून चालकांची तपासणी केली जात आहे. ‘ब्रेथ अॅनालायझर’च्या माध्यमातून मद्यसेवनाची खात्री झाल्यानंतर संबंधित वाहनचालकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; सतर्कतेचे आवाहन...

अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या मद्यपी वाहनचालकांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असून, वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्यानंतर वाहन चालवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790