नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला
नाशिक। दि. ४ नोव्हेंबर २०२६: सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. याचाच फायदा घेत विवाहाचे आश्वासन देऊन लॉजवर नेल्यानंतर तरुणीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे. मुर्शिद नईम अन्सारी (रा. बिहार) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. व्ही. खारकर यांनी आरोपीला तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. सोशल मीडियावरून पीडितेची आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने पीडितेला विवाह करण्याचे आश्वासन दिले. यानंतर २०२४ मध्ये एका लॉजवर नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.
या घटनेनंतर भद्रकाली पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत सपकाळे यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासादरम्यान परिस्थितीजन्य पुरावे संकलित करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जगदीश सोनवणे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि सादर केलेले पुरावे विचारात घेत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
![]()


