नाशिक: गंगापूर रोडवर बेकायदा वृक्षतोड; महापालिकेच्या हाती सीसीटीव्ही फुटेज

नाशिक। दि. १५ सप्टेंबर २०२६: शहरातील वृक्षतोड आणि अनधिकृत छाटणीवर न्यायालयीन निर्बंध असतानाही गंगापूर रोडवर झाडांची बेकायदा छाटणी व तोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काका का ढाबा ते बॉबीज हॉटेलदरम्यान शुक्रवारी आणि शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी काही झाडांची छाटणी केली. त्यातील काही झाडे थेट बुडापासून तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लोखंडी पाइपला दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वृक्षतोड तसेच छाटणीबाबत राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे अनधिकृतपणे झाडांची तोड होत असल्याने महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.

गंगापूर रोडवरील रस्त्यालगत असलेल्या झाडांवर ही कारवाई करण्यात आली. या घटनेदरम्यान संबंधित व्यक्तींच्या हालचालींसह एक ‘छोटा हत्ती’ वाहन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. महापालिका प्रशासनाने हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे संबंधितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी; घाटमाथ्यावर आज ‘यलो अलर्ट’

या प्रकरणाची चौकशी करून दोषींविरोधात कायदेशीर कारवाई तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महापालिका यांनी सांगितले की, “गंगापूर रोडवरील झाडांची बेकायदा छाटणी व तोड झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज महापालिकेला प्राप्त झाले असून, त्याआधारे चौकशी करण्यात येत आहे. संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल.”

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790