त्र्यंबकेश्वर। दि. ३१ ऑगस्ट २०२६: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नगरपरिषदेकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
श्रावणी सोमवारी मंदिर पहाटे ४ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. तसेच ब्रह्मगिरी परिक्रमेकरिता रविवारी सायंकाळपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून येत असून त्र्यंबकेश्वर शहरात भक्तांचा ओघ वाढला आहे.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. सुरक्षेच्या आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने देणगी दर्शन, अतितातडीची दर्शन सेवा तसेच व्हीआयपी दर्शन सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. याशिवाय गर्भगृह दर्शनालाही बंदी घालण्यात आली आहे.
रविवारीही त्र्यंबकेश्वर शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. सोमवारी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने भाविकांना संयम राखून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
![]()


