स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रूढ केलेल्या शब्दांची वाॅल उभारण्यात येणार
नाशिक। दि. २० ऑगस्ट २०२६: जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 मध्ये पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधांकरिता अनुदान या लेखाशीर्षाखाली नाशिक येथील अभिनव भारत मंदिरातील उर्वरित कामांसाठी 2 कोटी 50 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
या कामाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामासाठी तांत्रिक मान्यता तसेच प्रशासकीय मान्यता 2 कोटी 50 लाख रुपये इतकी आहे. मंजूर निधी केवळ प्रशासकीय मान्यता प्राप्त अंदाजपत्रकातील बाबींवरच खर्च करणे बंधनकारक असून वाढीव निधी अनुज्ञेय राहणार नाही. तसेच कामाची तांत्रिक गुणवत्ता राखणे, मंजूर अंदाजपत्रक व आराखड्यानुसार काम पूर्ण करणे आणि आवश्यक तपासणी, संनियंत्रण व मूल्यांकनाची जबाबदारी अंमलबजावणी यंत्रणेची राहणार आहे.
काम सुरू करण्यापूर्वी संबंधित जागेची मालकी, आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या संबंधित विभागांच्या अटी व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्याची नोंद संबंधित मालमत्ता नोंदवहीत करणे, पूर्णत्वाचा दाखला व उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे तसेच देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित शासन अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे सोपविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मंजूर कामांची माहिती दर्शविणारा फलक कामाच्या दर्शनी भागावर लावणे, कामाचा प्रगती अहवाल निर्धारित मुदतीत सादर करणे तसेच शासनाच्या विहित पद्धतीनुसार ई-निविदा प्रक्रियेचा अवलंब करणेही बंधनकारक आहे. सदर काम सार्वजनिक लोकोपयोगी स्वरूपाचे असून त्यातून कायमस्वरूपी सार्वजनिक मालमत्ता निर्माण होणे अपेक्षित आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या कामामुळे अभिनव भारत मंदिराच्या उर्वरित विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा होलोग्राम व्हिडिओ
मराठी भाषेला समृद्ध व आधुनिक स्वरूप देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे योगदान आहे. होलोग्राम व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार, कार्य आणि योगदान समजून घेण्यास व त्याबाबत जाणून घेण्यास मदत होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रूढ केलेल्या शब्दांचे भित्तिचित्र (वॉल) उभारण्यात येणार आहे. त्यांनी ‘भाषाशुद्धी’च्या अभियानातून मराठी भाषेत अनेक नवीन शब्दांची निर्मिती व प्रसार केला. १९२० व १९३० च्या दशकात त्यांच्या लेखन व संपादकीय कार्यातून शेकडो मराठी शब्द प्रचलित झाल्याचे मानले जाते. सावरकरांच्या ‘मराठी भाषेचे शुद्धीकरण’ या महत्त्वपूर्ण ग्रंथासह विविध साहित्यिक संकलनांमध्ये त्यांच्या कार्याशी संबंधित अनेक शब्दांचा उल्लेख आढळतो.
यामध्ये महापौर, संसद, दूरध्वनी, चित्रपट, आदेश, दिनांक यांसारख्या शब्दांचा समावेश आहे. दैनंदिन प्रशासन, पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवनात या शब्दांचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार झाला आहे. संस्कृत धातूंवर आधारित नवीन शब्द निर्माण करण्याबरोबरच सावरकरांच्या भाषाशुद्धी अभियानामुळे फारसी, अरबी आणि इंग्रजी भाषेतील प्रचलित शब्दांना पर्याय म्हणून अनेक भारतीय व स्थानिक शब्दांचे पुनरुज्जीवन, प्रमाणिकरण आणि राज्यातील प्रशासकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात पद्धतशीरपणे वापर करण्यास चालना मिळाली.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, आमदार प्रा. देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी या ठिकाणी नुकतीच भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांनी वरील दोन बाबींचा समावेश करण्याबाबत सूचना केल्या होत्या. या सुचनांची दखल घेऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी म्हटले आहेत.
![]()


