नाशिक। दि. १९ ऑगस्ट २०२६ : आडगाव शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावरील दहावा मैल परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे आणि पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने झालेल्या अपघातात डीआरडीओ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. धनंजय कुमार ठाकूर (रा. ओझर टाऊनशिप) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मंगळवारी (दि. १८) सकाळी ही दुर्घटना घडली.
ठाकूर हे डीआरडीओमध्ये अॅडमिन असिस्टंट (ब) पदावर कार्यरत होते. ते नेहमीप्रमाणे मोपेड दुचाकी (एमएच १५ एफजे ७२६८) वरून ओझर टाऊनशिप येथून कामावर जाण्यासाठी निघाले होते. आडगाव शिवारात महामार्गालगत काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक शेजारील मार्गावरून वळविण्यात आली आहे.
पावसामुळे या पर्यायी मार्गावर माती, गाळ आणि चिखल साचल्याने रस्ता निसरडा झाला होता. पुढे वळण घेत असताना ठाकूर यांची दुचाकी घसरली आणि ते रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाच्या चाकाखाली ते सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, सायंकाळपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
![]()


