नाशिक, दि. १८ ऑगस्ट २०२६: नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, बागलाण तसेच त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील काही भागांना सोमवारी पुन्हा भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. मुरुमदरी, रोकडपाडा, डोंगराळे, राहूड, उंबरपाडा दिगर आणि सरड परिसरातही हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या नोंदीनुसार, पहिला धक्का सोमवारी पहाटे ५ वाजून ६ मिनिटे ४३ सेकंदांनी नोंदवला गेला. या भूकंपाची तीव्रता २.५ रिश्टर इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश २०.४५७ आणि रेखांश ७३.६९१ येथे असून त्याची खोली पाच किलोमीटर होती.
यानंतर दुपारी १२ वाजून ४० मिनिटे ३१ सेकंदांनी दुसरा धक्का जाणवला. त्याची तीव्रता ३.२ रिश्टर इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश २०.४९९ आणि रेखांश ७३.८०० येथे, तर खोली पाच किलोमीटर असल्याचे केंद्राच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे. दोन्ही भूकंपांच्या नोंदींची पडताळणी करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेठ, सुरगाणा आणि कळवण परिसरात वारंवार सौम्य भूकंपीय हालचाली जाणवत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. सध्या या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र, सातत्याने जाणवणाऱ्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील भूकंपीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. भूकंपाच्या हालचालींचा अभ्यास आणि अधिक अचूक नोंदी करण्यासाठी दिल्लीहून केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल झाले होते. या पथकाने पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि मालेगाव परिसरात आधुनिक भूकंपमापन यंत्रणा बसवली आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
![]()


