नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाने बनावट वर्कऑर्डर; तीन कोटींची फसवणूक उघड; दोघांना अटक

नाशिक। दि. १३ ऑगस्ट २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विविध विकासकामांच्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल ३ कोटी ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट यादी, खोटी राजमुद्रा, विभागीय आयुक्तांची बनावट स्वाक्षरी तसेच महापालिकेच्या टेंडर नोटीसचा क्रमांक वापरून संशयितांनी कंत्राटदारांना बनावट वर्कऑर्डर दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक १च्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून तनय आनंद महाजन (वय ३२) आणि नरेंद्र तोताराम महाजन (वय ५१) या दोघांना अटक केली आहे. त्यांचा साथीदार शकील अहमद शेख हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध शासकीय विभागांकडून मोठ्या प्रमाणात विकासकामे आणि कंत्राटी कामे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीचा गैरफायदा घेत संशयितांनी पोलिसांसाठी हाउसकीपिंग, भोजन पुरवठा आदी कामांची बनावट यादी तयार केली. या कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यावर भारत सरकारची राजमुद्रा तसेच विभागीय आयुक्तांची बनावट स्वाक्षरी असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून नाशिकमार्गे पुण्याला जाणाऱ्या २ बांगलादेशींना अटक !

संशयितांनी अशा प्रकारच्या पाच बनावट वर्कऑर्डर तयार करून कंत्राटदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगत तिघा फिर्यादींकडून त्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून घेतले.

मात्र, संबंधित कंत्राटदारांनी या कामांबाबत अधिकृत स्तरावर चौकशी केली असता, अशा स्वरूपाची कोणतीही निविदा किंवा कामाची जाहिरात प्रसिद्ध झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी इतर कंत्राटदारांशी संपर्क साधला असता त्यांचीही अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचे समोर आले.

फसवणुकीची खात्री झाल्यानंतर तिघांनी थेट पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. तिघा कंत्राटदारांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या असून त्यानुसार तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी; गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

५९१ कोटींच्या कामांचे बनावट वर्कऑर्डर:
संशयितांनी तब्बल ५९१ कोटी रुपयांच्या पाच वेगवेगळ्या कामांचे बनावट वर्कऑर्डर तयार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे फिर्यादींकडून अनुक्रमे १ कोटी ४० लाख, १ कोटी १५ लाख आणि ५० लाख रुपये, असे एकूण ३ कोटी ५ लाख रुपये उकळण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून फरार संशयित शकील अहमद शेख याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, याच टोळीने अशाच पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेंतर्गत स्व-गणना पत्रक न भरलेल्या मतदारांनी 17 ऑगस्टपर्यंत भरावेत

नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली ५९१ कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर; ३ कोटींची फसवणूक, दोघांना जळगावहून अटक करण्यात आली आहे.गोदावरी काठावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) तयार करून मोठी आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट समोर आले आहे. यामध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचा मंत्री गिरीश महाजन यांच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही. यापूर्वी देखील त्यांनी जामनेर मध्ये असेच लोकांची फसवणूक केलेली आहे. नशेच्या आहारी गेलेले असून त्यांना दारूचे व्यसन जडलेलं आहे. त्यांच्या या उद्योगामुळे सदर तरुणांचे कुटुंबियांशा देखील त्यांनी रस्तावर आणलेले आहे, शेतजमीन विकावी लागलेली आहे. आरोपी कोणीही असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे यापूर्वीच निर्देश पोलीस विभागाला दिले आहेत- मंत्री गिरीश महाजन

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790