नाशिक। दि. ११ ऑगस्ट २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक–नांदुरी रस्त्याच्या सुरू असलेल्या रुंदीकरण कामाची मंगळवारी सकाळी पाहणी करण्यात आली. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता देवेंद्र पवार, कुंभमेळा प्राधिकरणाचे उपआयुक्त योगेंद्र चौधरी तसेच, कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि तृतीय पक्ष गुणवत्ता नियंत्रण पथकातील अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी केली.
या वेळी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची भौतिक प्रगती, बांधकामाची गुणवत्ता आणि कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. तसेच युटिलिटी स्थलांतर, भूसंपादनाशी संबंधित बाबी, कामातील अडथळे आणि काम पूर्ण करण्याचे नियोजित वेळापत्रक याबाबतही माहिती घेण्यात आली.
आयुक्त शेखर सिंह यांनी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेची पाहणी करून कामाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित तांत्रिक निकष, गुणवत्ता मानके आणि लागू नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, यावर त्यांनी भर दिला. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक त्या गुणवत्ता चाचण्या नियमितपणे घेऊन त्याची नोंद ठेवावी तसेच तपासणीदरम्यान आढळणाऱ्या त्रुटींची तातडीने पूर्तता करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, कंत्राटदार, आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेने परस्पर समन्वयाने काम करावे, कामातील अडथळे तातडीने दूर करावेत आणि नियोजित वेळापत्रकानुसार कामाची प्रगती सुनिश्चित करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
कामाची भौतिक प्रगती, गुणवत्ता नियंत्रणाची कार्यवाही आणि अपेक्षित पूर्णत्वाचा कालावधी यासह प्रकल्पाची अद्ययावत माहिती नियमितपणे उपलब्ध ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते व वाहतूक पायाभूत सुविधांची कामे वेळेत आणि निर्धारित गुणवत्तेच्या निकषांनुसार पूर्ण करण्यावर कुंभमेळा प्राधिकरणाकडून विशेष लक्ष दिले जात आहे.
![]()


