Amazon

नाशिकला आज पावसाचा ‘यलो अलर्ट’; गुरुवारपासून पुन्हा जोर वाढण्याची शक्यता

नाशिक। दि. ११ ऑगस्ट २०२६ : नाशिक शहरासह जिल्ह्यात आज, मंगळवारी (दि. ११) गडगडाटी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारपासून (दि. १३) पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कागदी टपालाला आळा; ई-ऑफिसचा प्रभावी वापर करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

मान्सूनला पोषक ठरणाऱ्या हवामान प्रणाली बंगालच्या उपसागरात पुन्हा सक्रिय होत असल्याने आगामी काळात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. मंगळवारी काही भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, सोमवारी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास नाशिक शहरातील विविध भागांत मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली. अशोकामार्ग, वडाळागाव, भारतनगर, वडाळारोड, पखालरोड, द्वारका आणि मुंबईनाका परिसरात पावसाच्या सरी झाल्या. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा: पर्वणीला १९० रुग्णवाहिका सज्ज, ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होणार

धरणांतून विसर्ग सुरू:
गंगापूर धरणातून सध्या ४९० क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. तसेच कश्यपी आणि गौतमी-गोदावरी धरणातून प्रत्येकी २५० क्यूसेक पाणी गंगापूर धरणात सोडले जात आहे. आगामी काळात पावसाचा जोर वाढल्यास धरणांमधील पाणीसाठा आणि विसर्गाच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790