नाशिक जिल्ह्यास ‘रेड अलर्ट’; अतिमुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क

नाशिक। दि. ३१ जुलै २०२६: भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी (३१ जुलै) नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हा आणि घाटमाथा परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, मध्यरात्रीपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाले असून नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेषतः घाटमाथा, डोंगरपायथा आणि नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी धोकादायक ठिकाणी थांबू नये तसेच आवश्यक असल्यास सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. दक्षिण नाशिकमधील अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनालाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: साधुग्राममधील प्रत्येक सुविधा भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ७० किलोमीटर इतका राहू शकतो. विशेषतः इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा सर्वाधिक धोका वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जलसंपदा विभागालाही आवश्यक सूचना दिल्या आहेत. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक धरणांतील पाणीसाठा क्षमतेच्या जवळ पोहोचल्याने, आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने आणि नियंत्रित पद्धतीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जोरदार पाऊस झाल्यास नद्यांमध्ये नव्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अन्न भेसळ, अस्वच्छतेबाबत नागरिक सजग; नाशिक विभागात ऑनलाइन पोर्टलवर १२४ तक्रारी

गुरुवारी ग्रामीण भागात दिवसभर मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू होत्या. सर्वाधिक ४५ मिमी पावसाची नोंद इगतपुरी येथे झाली. त्याखालोखाल भावली येथे ३५ मिमी, भाम धरण परिसरात ३७ मिमी, आंबोली येथे २६ मिमी, त्र्यंबकेश्वर येथे २० मिमी, वाकी येथे १४ मिमी, गंगापूर येथे १४ मिमी आणि मुकणे येथे १२ मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक शहरात मात्र दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले असून अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या. सायंकाळपर्यंत शहरात २.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790