
नाशिक। दि. ३० जुलै २०२६: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामच्या नियोजनात भाविकांची सुरक्षितता, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, नदी संवर्धन, जलनिस्सारण, आपत्कालीन सेवा, अखाड्यांच्या आवश्यक सुविधा तसेच भविष्यातील वाढत्या गरजांचा सर्वंकष विचार करून प्रत्येक सुविधा भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरेल, अशा पद्धतीने अंतिम आराखडा तयार करावा, अशा सूचना नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित साधुग्राम नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस आयुक्त डॉ संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय ऐनपुरे, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नाशिक व त्र्यंबकेश्वर साधुग्रामसाठी विविध तांत्रिक निकषांच्या आधारे भाविकांची संख्या व सर्व पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त श्री. गेडाम यांनी घाटांची जास्तीत जास्त लांबी सर्वसामान्य भाविकांसाठी उपलब्ध ठेवावी. गर्दीची घनता कमी करण्यासाठी रस्ते, घाट, पार्किंग आणि पादचारी मार्गांचे वैज्ञानिक नियोजन करावे, तसेच सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून वेळबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या.
महावितरणच्या उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे प्रभावित होणाऱ्या भूखंडांचा आढावा घेऊन आरक्षण क्षेत्रातील कायमस्वरूपी रस्त्यांच्या संरेखनानुसार वीजवाहिन्यांचे पुनर्संरेखन करण्याचा पर्याय विचारात घेण्याबाबत चर्चा झाली. उर्वरित ठिकाणी आवश्यक तांत्रिक उपाययोजना करून साधुग्रामासाठी अधिक उपयुक्त जागा उपलब्ध करण्याचे नियोजन सादर करण्यात आले.
बैठकीत नाशिक व त्र्यंबकेश्वर साधुग्राममधील घाट, नव्याने विकसित होणारे घाट, नैसर्गिक नाले, रिंग रोड, पादचारी मार्ग, व्हीआयपी प्रवेश, रस्ते, अंतर्गत वाहतूक व्यवस्था, पार्किंग, नदी संरक्षित पट्टा, टेंट सिटी, अखाड्यांचे भूखंड, व्हीआयपी क्षेत्र, सांस्कृतिक व सार्वजनिक सुविधा, अतिरिक्त जागेचे नियोजन, उच्चदाब वीजवाहिन्यांचे पुनर्संरेखन, नैसर्गिक जलप्रवाह, जलनिस्सारण व्यवस्था, पादचारी मार्ग, कोडंबिका देवी ट्रस्टच्या जागेची चर्चा आणि स्वतंत्र ड्रेनेज आराखडा तयार करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच भविष्यातील विस्तारासाठी आवश्यक जागेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
साधुग्रामासाठी अतिरिक्त भूभागाचा समावेश, अखाड्यांच्या पारंपरिक स्थानांचा सन्मान राखून भूखंडांचे नियोजन, नदीकाठच्या भौगोलिक परिस्थितीनुसार घाटांचा विकास, भाविकांच्या सुरक्षित हालचालीसाठी रस्त्यांची योग्य रुंदी, बॅरिकेडिंग, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि आरोग्य सुविधांचे एकात्मिक नियोजन यावरही बैठकीत चर्चा झाली.
यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे प्रस्तावित साधुग्रामच्या आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले. मागील सिंहस्थातील अनुभव, विविध विभागांशी झालेली सल्लामसलत, प्रत्यक्ष स्थळ पाहणी, अखाड्यांच्या सूचना, अपेक्षित भाविकसंख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती त्यांनी दिली.
![]()


