नाशिक: अंबड एमआयडीसीतील जीवघेण्या खड्ड्याचा आणखी एक बळी; व्यावसायिकाचा मृत्यू

नाशिक। दि. ३० जुलै २०२६: अंबड एमआयडीसी परिसरातील एक्स्लो पॉइंट चौकातील धोकादायक खड्ड्यामुळे आणखी एका नागरिकाचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कामटवाडे येथील व्यावसायिक नीलेश प्रल्हाद कोतकर (वय ४०, रा. आनंदनगर) यांचा मंगळवारी (दि. २८) अपघातानंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत चार जणांचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोतकर हे दुपारी सुमारे १.३० वाजता एक्स्लो पॉइंट परिसरातून डीजीपीनगर-२ मार्गे आपल्या राहत्या घरी दुचाकीवरून जेवणासाठी जात होते. एक्स्लो पॉइंट चौकातील खड्डा टाळण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या दुचाकीला शेजारून जाणाऱ्या अज्ञात वाहनाचा धक्का लागल्याने ते रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्यासह हात-पायांना गंभीर दुखापत झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ११ तोळ्यांचे दागिने घेऊन पसार झालेली मोलकरीण अटकेत !

रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने वडाळा रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.

यापूर्वीच्या खड्ड्यांमुळे झालेल्या दुर्घटना:
अंबड लिंक रोड:
खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात प्रभाकर निकम (४९) यांचा मृत्यू.
श्रमिकनगर: रस्त्यातील खड्ड्यात दुचाकी घसरून माजी सैनिक प्रवीण गायकवाड (५४) यांचा मृत्यू.
मेरी रोड: खोदलेल्या रस्त्यावर दुचाकी घसरल्याने दीपाली बेळे (६६) यांचा मृत्यू.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जागतिकस्तरावर नावलौकिक उंचवणार-राज्यपाल जिष्णू देव वर्मा

खड्ड्यांवरून राजकीय वातावरण तापले:
या घटनेनंतर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खड्ड्यांच्या प्रश्नावर ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले असून ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात धडक देत आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे, मृताच्या नातेवाईकांनी शहर अभियंत्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करून दोषींवर कारवाईची मागणी केली.

🔎 हे वाचलं का?:  रशियात शिकणाऱ्या १७ भारतीय विद्यार्थ्यांची ३.४८ कोटींची फसवणूक; नाशिकच्या तरुणाला अटक !

संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी:
सतत घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. रस्त्यांच्या देखभालीतील निष्काळजीपणासाठी संबंधित अधिकारी आणि रस्ता ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790