Amazon

नाशिक: त्र्यंबकेश्वरला उभारणार पाच भूकंपीय निरीक्षण केंद्रे – शेखर सिंह

नाशिक। दि.२८ जुलै २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) यांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील भूस्खलन प्रतिबंध आणि भूकंपीय अभ्यासासाठी संयुक्त कृती आराखडा निश्चित केला आहे. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा: पर्वणीला १९० रुग्णवाहिका सज्ज, ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होणार

या निर्णयानुसार त्र्यंबकेश्वरमध्ये पाच भूकंपीय निरीक्षण केंद्रे (Seismic Monitoring Stations) उभारून तीन महिन्यांचा सविस्तर भूकंपीय अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासातून परिसरातील भूकंपीय हालचालींचा वैज्ञानिक अभ्यास होणार असून, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचे नियोजन आणि आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. या अभ्यासासाठी आवश्यक जागा निश्चित करणे, जीएसआयच्या अधिकाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था आणि इतर आवश्यक समन्वयाची जबाबदारी कुंभमेळा प्राधिकरण पार पाडणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कागदी टपालाला आळा; ई-ऑफिसचा प्रभावी वापर करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

बैठकीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील भूस्खलनप्रवण ठिकाणांचे ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात फेरसर्वेक्षण करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या पाहणीच्या आधारे संवेदनशील स्थळांची निश्चिती करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.

भूस्खलन आणि भूवैज्ञानिक अभ्यासासंदर्भातील सर्व पत्रव्यवहार आणि समन्वय एकाच नोडल यंत्रणेमार्फत करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. तसेच, भूस्खलनग्रस्त ठिकाणांची अद्ययावत माहिती, जीपीएस निर्देशांक आणि छायाचित्रे जीएसआयला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कुंभमेळा प्राधिकरण पार पाडणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रविवार कारंजा परिसरात FDAची धडक कारवाई; ६,६५९ किलो गूळ जप्त; भेसळ व निकृष्ट दर्जाचा संशय

या बैठकीस जीएसआय राज्य विभागाचे उपमहासंचालक डॉ. बिभास सेन, राज्य विभागाचे संचालक मेगो चासी, जीएसआय नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक साबीर पठाण, भूभौतिकशास्त्रज्ञ अक्षय जोशी तसेच कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रंदिवे उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790