नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

नाशिक। दि. २५ जुलै २०२६: घरबसल्या पार्टटाईम जॉब आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीवर ३० टक्के अधिक परताव्याचे आमिष दाखवत एका तरुणाची ₹१४ लाख ६४ हजारांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

तक्रारीनुसार, २२ मे ते २५ जून २०२६ या कालावधीत सोशल मीडियाद्वारे ‘सुजाता सोनवणे’, ‘माधवी’ आणि ‘अद्विका’ या नावांनी संपर्क साधणाऱ्या महिलांनी संबंधित तरुणाला घरबसल्या पार्टटाईम जॉबची ऑफर दिली. सुरुवातीला पंचतारांकित हॉटेल्सना ऑनलाइन रिव्ह्यू देण्यासारखे सोपे टास्क देण्यात आले.

विश्वास निर्माण करण्यासाठी सुरुवातीच्या टास्कचे पैसे तरुणाच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर अधिक कमाईचे आमिष दाखवत त्याला पेड टास्क स्वीकारण्यास प्रवृत्त करण्यात आले. मोबाईलवर विविध लिंक पाठवून टास्क पूर्ण झाल्याचे आणि मिळालेल्या रकमेचे बनावट तपशील दाखवण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

यानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास ३० टक्के नफा मिळेल, असे सांगून आरोपींनी विविध यूपीआय आयडी आणि बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले. या आमिषाला बळी पडलेल्या तरुणाने एकूण ₹१४.६४ लाखांची गुंतवणूक केली.

गुंतवलेली रक्कम आणि नफ्यासह परतावा मागितल्यानंतर संशयितांनी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणाने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790