नाशिक: गंगापूर धरणातून १२,६०० क्युसेक विसर्ग; गोदावरीची पातळी वाढणार, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

नाशिक। दि. २३ जुलै २०२६: त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणात पाण्याची आवक वेगाने वाढली असून धरणातून सध्या १२ हजार ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शहर परिसरातील पावसाचाही परिणाम गोदावरी नदीवर होत असून होळकर पुलाजवळ सध्या १९ हजार ७९ क्युसेक वेगाने पाणी वाहत आहे. सायंकाळपर्यंत नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदीकाठ आणि सखल भाग टाळून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कश्यपी धरण ७१ टक्के, तर गौतमी गोदावरी धरण ९० टक्के भरले आहे. त्यामुळे गंगापूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून धरणाची साठवण क्षमता ९७ टक्क्यांवर पोहोचली आहे. यामुळे नियंत्रित स्वरूपात १२,६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.

नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने गोदावरी नदीतील प्रवाह वाढला आहे. होळकर पुलाजवळील पाण्याचा प्रवाह सध्या १९,०७९ क्युसेक असून सायंकाळपर्यंत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सराफ बाजार परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महानगरपालिका, पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. सायखेडा आणि चांदोरी परिसरातील परिस्थितीवरही वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्या परिस्थिती गंभीर नसली तरी नागरिकांनी कोणतीही निष्काळजीपणा करू नये. गोदावरी नदीतील आतापर्यंतचा सर्वाधिक विसर्ग ६२ हजार क्युसेक इतका नोंदवला गेला होता, तर २००८ मध्ये ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला होता. सध्या त्या तुलनेत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मागील २४ तासांत त्र्यंबकेश्वर तालुक्यात १९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मालेगाव येथे गिरणा नदीकाठावरील १६ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार वाऱ्यामुळे पत्रा उडून एका पर्यटकाला दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर नदीपात्रात अडकलेल्या बसमधील सर्व प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून गुजरातमधील बलसाड प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवला जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक औषधसाठा आणि सर्पदंश प्रतिबंधक लशी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महावितरणलाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नदी परिसराची पाहणी करून यंत्रणेला आवश्यक निर्देश दिले आहेत. सध्या जिल्ह्यातील सात रस्ते वाहतुकीसाठी बंद असून ते लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

प्रशासनाने नागरिकांना विनाकारण नदीपात्र, पूल किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ न जाण्याचे आवाहन केले असून अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790