नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; आठ धरणांतून विसर्ग, ऑरेंज अलर्ट

नाशिक। दि. २३ जुलै २०२६: नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून पश्चिम पट्ट्यातील अनेक तालुक्यांत मुसळधार सरी कोसळत आहेत. पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असल्याने दारणा, गंगापूर, नांदूरमध्यमेश्वरसह एकूण आठ धरणांमधून नदीपात्रात नियंत्रित पद्धतीने पाणी सोडण्यात येत आहे.

मंगळवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी पहाटेपर्यंत इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवण आदी तालुक्यांत जोरदार हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने घाटमाथ्यासाठी सुरुवातीला ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ७,९२४ क्युसेक वेगाने जायकवाडीच्या दिशेने विसर्ग करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

गेल्या २४ तासांतील पावसाची नोंद पाहता इगतपुरी येथे सर्वाधिक १५० मिमी, आंबोली येथे १३१ मिमी, भावली ९३ मिमी, घोटी ८७ मिमी, त्र्यंबकेश्वर ८३ मिमी, गौतमी ६९ मिमी, वाकी परिसर ६५ मिमी, गंगापूर ६० मिमी, कश्यपी ४० मिमी, मुकणे ३४ मिमी, तर नाशिक तालुक्यात ३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दारणा, भावली, गंगापूर, गौतमी, कडवा, पालखेड आणि पुणेगाव धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे या धरणांतूनही आवश्यकतेनुसार विसर्ग करण्यात येत आहे.

दरम्यान, गुरुवारी (दि. २३) सकाळपर्यंत नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १२,४०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच गंगापूर धरणातून सकाळी ६ वाजता ४९० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. पावसाचा जोर आणखी वाढल्यास टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

शहरातही संततधार कायम:
नाशिक शहरातही मंगळवारनंतर बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. मध्यवर्ती भाग, पूर्व आणि दक्षिण उपनगरांमध्ये पावसाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवला. दिवसभर हलक्या सरी सुरू असताना मध्यरात्री ते पहाटेदरम्यान जोरदार पाऊस झाल्याने शहरात २८ मिमी पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाने गुरुवारी घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी तसेच धरणांच्या खालील भागातील रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790