नाशिक: आर्थिक विवंचनेतून पत्नी व सात वर्षीय मुलाची हत्या; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक। दि. २१ जुलै २०२६: जेलरोड परिसरातील वसंत विहारजवळील गोकुळ नगर येथे सोमवारी (दि. २०) पहाटे घडलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेने शहरात खळबळ उडाली. आर्थिक अडचणी आणि नैराश्याच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीने झोपेत असलेल्या पत्नी व सात वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधिताने स्वतःच्या हाताची नस कापून विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ जळगाव येथील किरण एकनाथ हजारे (वय ५४) हे पत्नी अश्विनी हजारे (वय ४३) आणि मुलगा सुयश हजारे (वय ७) यांच्यासह अरिंगळे चाळीतील एका खोलीत वास्तव्यास होते. किरण हजारे हे सोलर उपकरणे तसेच रुग्णालयांसाठी ऑक्सिजन सिलिंडरच्या मार्केटिंगचे काम करत होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते आर्थिक विवंचनेमुळे मानसिक तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांनी प्रथम पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आईच्या आरडाओरडामुळे जाग आलेल्या सात वर्षीय सुयशवरही त्यांनी वार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दोघांचा मृत्यू झाल्यानंतर किरण हजारे यांनी स्वतःवर वार करून विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

दुपारपर्यंत घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. खिडकीतून पाहिल्यानंतर तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता अश्विनी आणि सुयश यांचा मृत्यू झाल्याचे आढळले, तर किरण हजारे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

जखमी किरण हजारे यांच्यावर नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्याविरुद्ध पत्नी व मुलाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अश्विनी आणि सुयश यांच्या मृतदेहांचे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790