आजपासून तीन दिवस नाशिक जिल्ह्यासाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’

नाशिक। दि. २१ जुलै २०२६ गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाचे मंगळवार (दि. २१) पासून नाशिक शहर व जिल्ह्यात जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या घाटमाथा परिसरासाठी मंगळवार ते गुरुवार (दि. २३) दरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

सोमवारी दिवसभर नाशिक शहरात ढगाळ वातावरण होते. अधूनमधून हलक्या सरीही बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले आहे. या प्रणालीचा प्रभाव उत्तर भारतासह मध्य प्रदेशातही जाणवत असून, तेथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या बदलाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचे ढग अडवल्यामुळे या भागात तुलनेने अधिक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने घाट परिसरासाठी सलग तीन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः गुरुवारी घाट भागात विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, वातावरणातील बदल आणि मान्सूनला बळकटी देणाऱ्या प्रणाली सक्रिय झाल्याने आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790