कुंभमेळा हा अध्यात्मासह अर्थव्यवस्थेलाही चालना देणारा महाउत्सव- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक। दि. १९ जुलै २०२६: आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा नसून प्रादेशिक अर्थव्यवस्थेला गती देणारा, रोजगारनिर्मितीला चालना देणारा महाउत्सव आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट (एसआयओएम), नाशिक येथे आयोजित ‘सुशासन, अर्थव्यवस्था आणि कुंभ व्यवस्थापन’ या विशेष परिसंवादात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

यावेळी एसआयओएमच्या संचालिका डॉ. वंदना सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात केपीएमजीचे असोसिएट डायरेक्टर प्रितम देशमुख, असिस्टंट मॅनेजर सौम्यजित मंडल, स्पेशालिस्ट अक्षय भोईटे, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद सार्वजनिक प्रशासनाची कार्यपद्धती स्पष्ट करताना म्हणाले की, शासन व्यवस्थेचे उद्दिष्ट केवळ आर्थिक वृद्धी नसून सामाजिक कल्याण, समावेशक विकास आणि संसाधनांचे न्याय्य वितरण सुनिश्चित करणे हे आहे. देशाच्या प्रगतीचे मोजमाप केवळ जीडीपी किंवा बाजारमूल्यावर न करता समाजातील संधी व संसाधनांचे समान वितरण कितपत झाले, यावरही केले गेले पाहिजे असे सांगत त्यांनी ‘जिनी गुणांक’ (Gini Coefficient) या संकल्पनेचा संदर्भ देत समावेशक विकासाचे महत्त्व विशद केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डाक विभागाची २४ ला पेन्शन अदालत, २० पर्यंत करा अर्ज

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात बोलताना श्री. प्रसाद यांनी कुंभमेळा हा अध्यात्म, अर्थव्यवस्था आणि आधुनिक ऑपरेशन्स मॅनेजमेंट यांचा संगम असल्याचे सांगितले. या महाउत्सवामुळे स्थानिक व्यापार, पर्यटन, सेवा क्षेत्र आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळून प्रादेशिक अर्थव्यवस्थेत भांडवल आणि रोख प्रवाह वाढतो, असे त्यांनी स्पष्ट केले. केन्सियन आर्थिक विकास सिद्धांताचा संदर्भ देत त्यांनी कुंभमेळ्याच्या आर्थिक परिणामांवर प्रकाश टाकला. तसेच कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर भागधारकांमधील प्रभावी समन्वय अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'संकल्प से सिद्धी' उपक्रमातून नाशिकच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी संशोधन, सल्लागार प्रकल्प आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांच्या माध्यमातून कुंभमेळ्याशी संबंधित प्रत्यक्ष प्रशासकीय आव्हानांवर काम करण्याचे आवाहन केले. जीआयएस (GIS), मॅटलॅब (MATLAB), एसपीएसएस (SPSS) आणि ट्रॅफिक सिम्युलेशन यांसारख्या आधुनिक विश्लेषणात्मक साधनांचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत (NTKMA) विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि सल्लागार प्रकल्पांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

केपीएमजीचे असोसिएट डायरेक्टर प्रितम देशमुख यांनी भारताच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाचा आढावा घेत देशाच्या ३० ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्थेकडे होत असलेल्या प्रवासावर भाष्य केले. कृषी, द्राक्ष व वाइन उद्योग तसेच बहुआयामी लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हिटीमुळे नाशिकची आर्थिक क्षमता अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित प्रशासन, सक्षम आपत्कालीन यंत्रणा आणि विकेंद्रित व्यवस्थापनाच्या माध्यमातून ‘व्हिजन २०४७’ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: १० चाकी हायवा चोरीप्रकरणी दोघांना २४ तासांत अटक; ४७ सीसीटीव्हींच्या मदतीने शोध

परिसंवादात विद्यार्थ्यांनी सुशासन, सार्वजनिक धोरण, आर्थिक विकास, लॉजिस्टिक्स आणि कुंभ व्यवस्थापनासंदर्भातील विविध विषयांवर मान्यवरांशी संवाद साधत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. व्यवस्थापन शिक्षण, सार्वजनिक प्रशासन आणि प्रादेशिक आर्थिक विकास यांचा परस्परसंबंध अधोरेखित करणारा हा परिसंवाद विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि ज्ञानवर्धक ठरला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790