राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही; अनेक जिल्ह्यांत पावसाची प्रतीक्षा कायम

नाशिक | दि. १४ जुलै २०२६: जुलै महिना अर्धा उलटूनही राज्यातील अनेक जिल्ह्यांना अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान प्रणाली कमकुवत झाल्यामुळे राज्यात पुढील किमान पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता नसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; प्राणघातक हल्ल्यानंतर फरार पती परभणीतून अटकेत

यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव स्पष्टपणे जाणवत असून, पावसाअभावी अनेक भागांतील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या मराठवाड्यातील लातूर, बीड, परभणी तसेच यवतमाळ आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे. याउलट जुलैच्या प्रारंभी मुंबई, कोकण, पुणे आणि घाटमाथा परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली होती. घाटमाथ्यावरील काही ठिकाणी ५०० ते ६०० मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली होती. मात्र, हवामान प्रणाली कमकुवत झाल्यानंतर गेल्या ४८ तासांत या भागांतील पावसानेही विश्रांती घेतली असून अनेक ठिकाणी पावसाची नोंद शून्यावर आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ईपीएफओ ची 'विश्वास-2026' योजना जाहीर; दंडाच्या प्रलंबित प्रकरणांच्या सामोपचाराने निपटाऱ्यासाठी नियोक्त्यांना संधी

दरम्यान, पावसाच्या खंडामुळे राज्यातील अनेक भागांत उकाड्यात वाढ झाली आहे. नाशिकमध्ये सोमवारी (दि. १३ जुलै) कमाल तापमान ३१.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790