नाशिक: जादूटोण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला अटक

नाशिक। दि. ७ जुलै २०२६: व्यवसायात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेला जादूटोण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार, जबरदस्तीने विवाह तसेच तीन वर्षे मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी यौवन भानुदास गोवाड (रा. दारणा सांगवी, ता. निफाड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरात व्यवसाय करणाऱ्या पीडित महिलेची काही परिचितांमार्फत संशयिताशी ओळख झाली होती. व्यवसायात यश मिळवून देण्याचे आश्वासन देत संशयिताने मंतरलेले तांदूळ, कडक ऊद आणि विविध जडीबुटींच्या पुड्यांच्या माध्यमातून जादूटोणा केल्याचा बनाव केला. या बहाण्याने त्याने महिलेकडून पैशांची उकळपट्टी केल्याचा आरोप आहे.

🔎 हे वाचलं का?:  'म्हाडा' फसवणूक प्रकरणाची २७ जुलैला पहिली सुनावणी; एसआयटीने प्राथमिक दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

त्यानंतर, शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास जादूटोणा करून जीव घेण्याची धमकी देत संशयिताने महिलेवर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. स्वतः विवाहित असतानाही त्याने पीडितेशी जबरदस्तीने विवाह करून तिला सुमारे तीन वर्षे आपल्या ताब्यात ठेवत मानसिक व शारीरिक छळ केल्याचाही आरोप आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे दि. ८ जुलै रोजी आयोजन

दरम्यान, घरात सुरू असलेल्या भोंदूगिरीला पीडितेने विरोध केल्यानंतर संशयित अधिक आक्रमक झाला. तीन-चार दिवसांपूर्वी त्याने पीडित महिला आणि तिच्या अवघ्या एक वर्षाच्या मुलाचा गळा दाबून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेतून बचावल्यानंतर पीडितेने नातेवाइकांच्या मदतीने सायखेडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार सायखेडा पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह बलात्कार आणि इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महावितरणच्या दोन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, प्रल्हाद मिस्त्री आणि कृष्णा चांदगुडे यांनी अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडलेल्या इतर नागरिकांनीही भीती न बाळगता पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790