नाशिक। दि.३ जुलै २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संक्षिप्त विशेष पुनरीक्षण-2026 कार्यक्रमांतर्गत 125- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत, अचूक व त्रुटीरहित करण्यासाठी ऑनलाइन स्व-पडताळणी (Self-Authentication) प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी ECI Voter Portal / Voter Helpline App द्वारे आपले गणना प्र- पत्र (Enumeration Form) भरुन ही प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शुभांगी भारदे यांनी केले आहे.
125 – नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात संक्षिप्त विशेष पुनरीक्षण-2026 अंतर्गत ऑनलाइन स्व-पडताळणी (Self-Authentication) प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. या मतदार संघात एकूण 4,93,293 मतदार असून 413 यादी भाग आहेत. या मोहिमेच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी मतदान नोंदणी अधिकारी श्रीमती भारदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक तसेच सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व सहाय्यक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (ABLO) यांची बैठक घेऊन त्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सर्व बीएलओ व एबीएलओ यांना आवश्यक साहित्य (BLO Kit) वितरित करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत 29 जुलै 2026 पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन मतदारांची माहिती संकलित करणार असून आवश्यकतेनुसार गणना प्र- पत्र भरण्यास मदत करणार आहेत. मतदारांनी बीएलओ यांना आवश्यक सहकार्य करून आपली माहिती अचूक व अद्ययावत करून घ्यावी.
तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑनलाइन स्व-पडताळणी करून मतदार यादी अधिक विश्वासार्ह व त्रुटीरहित करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा. 125- नाशिक पश्चिम या मतदारसंघातील मतदारांसाठी हेल्पलाइन क्रमांकाची सुविधा देण्यात आली आहे. हेल्पलाइन क्रमांक 0253-2232346 असा आहे.
![]()


