
नाशिक। दि.२७ जून २०२६ कळवण येथील तीन मजली इमारतीतील एका फ्लॅटवर सायबर पोलिसांनी धाड टाकत अवैधरित्या ऑनलाइन गेमिंग व सट्टा-बेटिंगचे जाळे चालविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. शुक्रवारी (दि. २६) झालेल्या या कारवाईत पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बँकिंग कागदपत्रे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, देवळाली परिसरातील अरबाज शब्बीर शेख हा ऑनलाइन सट्टा व्यवसाय चालवत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर कळवणमधील गंगा निवास परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईत अरबाज शब्बीर शेख (२७, वडनेर दुमाला, देवळाली), आसीफ जाफर हुसेन (४२, लासलगाव, ता. निफाड), पठाण अरबाज खान फरीद खान (२३, हिंमतनगर, गुजरात), पंकज नामदेव आहेर (३४, वडनेर, पाथर्डी रोड, नाशिक) आणि सागर रमेश कांबळे (३८, कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली.
आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे, सहायक निरीक्षक धीरज गवारे तसेच साहिल सय्यद, दर्शन सोनवणे, भूषण देशमुख, गिरीश ठाकूर, कल्पेश पाटील आणि विकास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ग्राहकांना सोशल मीडियातून जाळ्यात ओढले जात होते:
प्राथमिक तपासात संशयितांची कार्यपद्धती उघड झाली आहे. वेबसाइट, सोशल मीडिया, मेसेजिंग अॅप्स आणि एजंटांच्या माध्यमातून ग्राहकांना बेटिंग प्लॅटफॉर्मशी जोडले जात होते. ग्राहकांकडून पैसे स्वीकारल्यानंतर त्यांच्या ऑनलाइन वॉलेटमध्ये रक्कम जमा झाल्याचे दाखवले जात असे. जिंकलेल्या रकमेचे व्यवहार विविध बँक खात्यांद्वारे केले जात होते. आर्थिक व्यवहारांचा माग काढणे कठीण व्हावे, यासाठी रक्कम अनेक खात्यांतून फिरविली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीआय, मोबाइल वॉलेट आणि इंटरनेट बँकिंगद्वारेही अनेक व्यवहार करण्यात आले. ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी अनेक मोबाइल क्रमांक आणि सिम कार्डचा वापर केला जात होता. व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसह विविध मेसेजिंग अॅप्सच्या माध्यमातून ग्राहकांना जोडले जात असल्याचा संशय असून, वेबसाइट व गेमिंग खात्यांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र सिम कार्ड वापरण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे.
मोठा मुद्देमाल जप्त:
या कारवाईदरम्यान पोलिसांनी चार लॅपटॉप, १८ मोबाइल फोन, तीन राउटर, विविध बँकांची ५४ पासबुक, चार चेकबुक, २५ एटीएम कार्ड, अनेक सिम कार्ड, हिशेबाच्या वह्या आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.
![]()


