नाशिक: प्रवाशाची ६ लाख रोकड असणारी बॅग लंपास करणारा रिक्षाचालक अटकेत

नाशिक। दि. २६ जून २०२६: नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातून प्रवाशाची ६ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन पसार झालेल्या रिक्षाचालकाला नाशिकरोड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. गुन्हे शोध पथकाने दिवसभर सापळा लावला होता. या कारवाईत मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले असून, दोघांकडून एकूण ४ लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  वाहनधारकांनो लक्ष द्या... PUC तपासणीसाठी आता इतके रुपये मोजावे लागणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काठेगल्ली येथील सौरभ गिरीश आहेर (वय ३०) हे २० जून रोजी पत्नीच्या उपचारासाठी आवश्यक असलेली ६ लाख रुपयांची रोकड घेऊन मुंबई-ठाणे येथून रेल्वेने नाशिकरोड येथे आले होते. रेल्वे स्थानकाबाहेर घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत असताना एका रिक्षाचालकाने त्यांना काठेगल्लीपर्यंत सोडण्याचे सांगितले. आहेर यांनी रोकड असलेली बॅग रिक्षात ठेवून काही क्षण बाजूला जाताच रिक्षाचालक बॅगसह फरार झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जप्त गौण खनिजांचा जाहीर लिलाव आता १ सप्टेंबरला; तारखेत बदल

गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शोध पथकाने वेगळी रणनीती अवलंबली. या तपासादरम्यान मोईन कुरेशी (रा. वडाळानाका, जुने नाशिक) याच्यावर संशय बळावला. त्यानुसार रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून पोलिसांनी त्याला एमएच-१५ जेए-५०९४ क्रमांकाच्या रिक्षेसह ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान कुरेशीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पुढील तपासात त्याचा साथीदार शहबाज सय्यद (रा. कथडा, जुने नाशिक) याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्यालाही अटक करून त्याच्याकडून आणखी २ लाख रुपये हस्तगत केले. दरम्यान, चोरीतील उर्वरित २ लाख रुपये पुणे येथील एका तरुणाकडे दिल्याची माहिती तपासात समोर आली असून, ती रक्कम जप्त करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790